महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आता राष्ट्रपतींपर्यंत थेट धडक दिली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा गाजत आहे. आता या मुद्द्यावर काँग्रेसने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाकडे, महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे चौकशीची मागणी करणारे सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांच्या आरोपांना नवे परिमाण मिळाले आहे.
नाना पटोले यांनी आपल्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांवर घाला घालणाऱ्या घटनांची गांभीर्याने चौकशी व्हावी. त्यांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेत प्रक्रियात्मक अनियमितता झाल्या आहेत. या सगळ्यामुळे कोट्यवधी मतदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
गंभीर, तथ्याधारित मुद्दे
राहुल गांधी यांनी अलीकडेच एका इंग्रजी वृत्तपत्रात महाराष्ट्रातील 82 विधानसभा मतदारसंघांतील 12 हजार हून अधिक मतदान केंद्रांवर अनियमितता झाल्याचे ठळकपणे नमूद केले होते. या लेखात मांडण्यात आलेले मुद्दे अत्यंत गंभीर आणि तथ्याधारित असल्याचे नाना पटोले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
पटोले यांचे म्हणणे आहे की, ही केवळ प्रशासकीय चूक नसून, संपूर्ण राज्यातील लोकशाही प्रक्रियेच्या पवित्रतेवरच गदा येण्यासारखी स्थिती आहे. गावांपासून ते शहरांपर्यंत आणि विशेषतः आदिवासी व मागास भागांतील मतदार यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांचे मत खरेच मोजले गेले का? निवडणूक निष्पक्ष झाल्या का? आणि जर या प्रक्रियेत घोटाळा झाला असेल, तर ती निव्वळ अनियमितता नसून संवैधानिक मूल्यांवरील आघात आहे.
Akola/Khamgaon : भरगड – सानंदा यांचा डाव अन् काँग्रेसला घाव; दादांना शरण
बरखास्त करावे
नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना सादर केलेल्या पत्रात दोन मुख्य मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेवर न्यायालयीन किंवा विशेष स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. दुसरी म्हणजे, या चौकशीचा अहवाल येईपर्यंत सध्याचे सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि राज्यात पुन्हा एकदा पारदर्शक, निष्पक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी.
नाना पटोले यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशाच्या सर्वोच्च संवैधानिक प्रमुख या नात्याने तुम्ही लोकशाहीची प्रतिष्ठा व नागरिकांचा विश्वास यांचे रक्षण करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. ही लढाई केवळ काँग्रेस किंवा राहुल गांधींची नाही, तर कोट्यवधी मतदारांची आहे, ज्यांचा आवाज आता देशाच्या सर्वोच्च व्यक्तीपाशी पोहोचत आहे.
राज्यभरात सध्या निवडणूक वारे पुन्हा वाहू लागले असतानाच, या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक राजकारण सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. आता राष्ट्रपतींचा या संदर्भातील निर्णय काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
