महाराष्ट्र

Akola : स्थानिक निवडणुकीत पंज्याचा हुंकार, भाजपचा गड ढासळणार?

Harshwardhan Sapkal : आता प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे

Post View : 24

Author

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात रंगली आहे. अशातच काँग्रेस पक्षही संघटन मजबुत करण्यासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एक नवीन अध्याय उघडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर गती घेत आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या जाहीर होण्याने पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असा स्पष्ट आदेश दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सपकाळ महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचा पंजा मजबूत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अकोला सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही त्यांनी आपली मुहूर्तमेढ रोवली आहे. जिथे पक्षांतर्गत वादामुळे भाजपची पकड ढिली झाली आहे.

6 ऑक्टोबर 2025 रोजी अकोला शहरात अमरावती विभागीय आढावा बैठकीत सपकाळ यांनी नेते आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली. ज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा जिंकण्यावर भर दिला. दिवाळीनंतर ही निवडणूक होण्याची शक्यता असल्याने, पक्षाची तयारी शिगेला पोहोचली आहे. सपकाळ यांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांच्या परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला आहे. कुठे पक्ष मजबूत आहे, कुठे कमकुवत आणि जागा वाढवण्यासाठी काय करावे लागेल यावर मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन आणि समन्वय प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी यशस्वीपणे सांभाळले.

Harshwardhan Sapkal : धान्य नष्ट, हतबल शेतकरी, नेते गुंग खाणीच्या मलईत

पक्षप्रवेशाने काँग्रेसला बळकटी

बैठकीत डॉ. सुनिल देशमुख, ॲड. गणेश पाटील, संध्याताई सव्वालाखे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार अमित झनक, आमदार धीरज लिंगाडे, आमदार साजिद पठाण, प्रकाश तायडे, राहुल बोंद्रे, शिवाजीराव मोघे, बबलू देशमुख, श्याम उमाळकर, बबनराव चौधरी, अशोक अमानकर, डॉ. प्रशांत पाटील वानखडे, हिदायत पटेल, डॉ. जिशान हुसेन, महेश गणगणे, महेंद्र गवई, अक्षय राऊत, प्रशांत पाचडे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे, आकाश कवडे, मोहम्मद इरफान, मोईन खान, पराग कांबळे, तश्वर पटेल यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. सपकाळ यांनी प्रत्येक जिल्हानिहाय बैठक घेतली. ज्यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख आणि ब्लॉक अध्यक्षांशी वैयक्तिक संवाद साधला. त्यांनी पक्षाच्या कमकुवत भागांना मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे ‘कानमंत्र’ दिले. जसे की, मतदारांशी जोडण्यासाठी घरोघरी जाणे, स्थानिक मुद्दे उचलणे आणि युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे. या रणनीतीमुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत जास्त जागा मिळवण्याची आशा आहे.

विशेष म्हणजे, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत कलहामुळे काँग्रेसने विजय मिळवला. ज्याने पक्षाला नवे बळ दिले आहे. आता महापालिका निवडणुकीसाठी अकोल्यात काँग्रेस आपले पाय रोवत आहे, जिथे पूर्वी भाजपची एकहाती सत्ता होती. बैठकीचा एक प्रमुख आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश. अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर आणि अकोला शहरातील आजी-माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. हे नेते इतर पक्षांतून आले असून, त्यांच्या येण्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. सपकाळ यांच्या हस्ते हा प्रवेश झाला, ज्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला. पाचही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष ते बूथप्रमुख, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्याने पक्षाच्या एकजुटीचे दर्शन घडवले.

Yavatmal : साहेबांची शिवसेना बनली कार्यकर्त्यांची पहिली पसंत

सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आता महाराष्ट्रात नव्या जोमाने मैदानात उतरत आहे. भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत, काँग्रेस स्थानिक निवडणुकीत मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. या बैठकीने अमरावती विभागात पक्षाची नवी उडान दाखवली, ज्यात कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ हा मंत्र देण्यात आला. आगामी दिवाळीनंतरच्या निवडणुकीसाठी ही तयारी कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे रोचक ठरेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!