काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा तीव्र संताप व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा जीव गुदमरतोय, पण सत्ताधाऱ्यांच्या हृदयात कणभरही दया नाही. दररोज सहा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत आहेत. तरीही महायुती सरकारच्या कानावर जूही पडत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फायलींवर सही करायला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हाताला लकवा मारलाय की काय? असा खरमरीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकार सत्तेत येऊन महिने लोटले, तरी शेतकऱ्यांच्या झोळीत कर्जमाफीचा एक दाणाही पडलेला नाही.
आंदोलने, उपोषणे, यात्रा सगळे झाले, पण सरकारच्या गेंड्याच्या कातडीसारख्या बधिर मनाला हलवणे अशक्यच. विरोधकांनी कितीही टीकेचा मारा केला, तरी सरकारला योग्य वेळ कधी येणार, हेच कळत नाही. शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचलाय. सपकाळ यांनी हा राग पुन्हा एकदा शब्दांत मांडला आहे. हे सरकार फक्त भ्रष्टाचाराच्या फायलींवर सही करते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत हात आखडता घेतो, असा घणाघात त्यांनी केला. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जाच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे.
Sandip Joshi : सायकलच्या पेडल सोबत वेगाने धावू लागली मुलांची स्वप्ने
जीवन वाचवण्याचे आवाहन
मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाईलवर एक व्हिडीओ बनवला, जो ऐकून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकतो. कर्जमाफी होईल, कर्जमुक्त होऊ, या आशेवर जगत होतो. पण या सरकारला गोरगरिब शेतकऱ्यांची पर्वा नाही, असं म्हणत त्यांनी जगाचा निरोप घेतला. हा व्हिडीओ ऐकून हर्षवर्धन सपकाळ यांचे मन सुन्न झाले, पण सत्ताधाऱ्यांना त्याचं काय? योग्य वेळी कर्जमाफी करू, असं निर्लज्जपणे सांगणारे हे सरकार किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. बी-बियाणे, खते, डिझेल सगळेच महागलं. शेतमालाला भाव नाही, निसर्गही दगा देतोय. तरीही सरकार फक्त वर्षाला सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचा अपमान करते.
सपकाळ यांनी सरकारला खडे बोल सुनावले, हे सरकार फक्त मलाई खाण्यात मग्न आहे. अदानी, अंबानींच्या फायलींवर सही करायला हात थरथरत नाही, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फायलींवर का थरथरतो? सपकाळ यांनी शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे, या निर्ढावलेल्या सरकारवर भरोसा ठेवू नका. आत्महत्या करू नका. तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबाचा विचार करा. शेतकऱ्यांचा हा लढा आता फक्त कर्जमाफीपुरता नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा आहे. सरकारच्या बेफिकिरीमुळे शेतकरी हताश झालेत, पण सपकाळ यांनी त्यांना धीर दिला आहे. शेतकरी बांधवांनो, हिम्मत हरू नका. तुमच्या हक्कासाठी लढा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी सांगितले.
Vice Presidential Election : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उतरतील का रणभूमीवर?
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. सरकारच्या कानठळ्या बसवणारा हा संताप आता थांबणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. आता प्रश्न हाच आहे की, सरकार खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार की फक्त योग्य वेळेची वाट पाहत राहणार?
