महाराष्ट्र

Nagpur : संघाच्या शताब्दी वर्षाला काँग्रेसची ‘संविधान भेट’

Harshwardhan Sapkal : फडणवीसांना 'चोर मुख्यमंत्री’ म्हणून टॅग

Author

महाराष्ट्रातील राजकारण सध्या गढूळ झाल्याचे दिसत आहे. अश्यातच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शंभर वर्षांचा महोत्सव साजरा करणार आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्याचे राजकारण अत्यंत गढूळ आणि ज्वलंत होत चालले आहे. मत चोरीचा वाद, आरक्षणाचा मुद्दा आणि शेतकरी कर्जमाफी यांसारख्या संवेदनशील विषयांवरून पक्षांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) शंभर वर्ष पूर्ण करत आहे. हा एक नियतीचा संकेत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

सपकाळ यांनी आरएसएसला आवाहन केले की, आता तरी नथुराम गोडसे आणि विखारी विचार सोडून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे संविधान तसेच गांधी विचार स्वीकारावेत. सपकाळ म्हणाले की, भारताचे संविधान ही एक ऐतिहासिक घटना आहे. ते देशाची प्रेरणा आहे. आरएसएसची अपेक्षा होती की संविधान मनुस्मृतीवर आधारित असावे. गोळवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसे पत्रही पाठवले होते. मात्र, आरएसएसचा विचार ‘आम्ही विशिष्ट लोक’ असा आहे, तर संविधानाचा विचार ‘आम्ही भारताचे लोक’ असा आहे. गोलवळकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ हे आरएसएस आणि भाजपाचे बायबल आहे.

Vijay Wadettiwar : कुणबी प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिकेची मागणी

संविधान सत्याग्रह यात्रा

संविधान नाकारणारा विचार हा भाजपाचा आहे. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांपर्यंत आरएसएसने त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नव्हता. आता शंभर वर्ष पूर्ण होत असताना, आरएसएसने विखारी आणि विषारी विचार सोडून संविधानाचा विचार स्वीकारावा, असे सपकाळ यांनी आवर्जून सांगितले.काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे, असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘संविधान सत्याग्रह यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू होऊन सेवाग्रामपर्यंत जाईल.

28 तारखेला महान क्रांतिकारी भगतसिंग यांच्या बलिदानदिनी मशाल मोर्चा काढला जाईल. तसेच नागपूरच्या संविधान चौकात सभेचे आयोजन आहे. 29 तारखेपासून यात्रेला सुरुवात होईल आणि यावेळी आरएसएसला संविधानाची भेट देण्यात येईल, अशी माहिती सपकाळ यांनी दिली. ही यात्रा संविधानाच्या मूल्यांना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, ज्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी जनजागृती होईल.दरम्यान सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचे पुरावे दिले आहेत.

राजकीय घडामोडीला वेग

फडणवीसांकडे गृहमंत्रालय आहे. त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील मत चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरीही फडणवीस निवडणूक आयोगाची ‘दलाली’ करत आहेत. त्यांनी ही दलाली बंद करावी, असे सपकाळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे ‘चोर मुख्यमंत्री’ आहेत. या आरोपांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे. ज्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष दिसून येत आहे.महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडी निवडणुकीच्या निकटवेळी अधिक रोचक आणि तीव्र बनवत आहेत. एकीकडे संविधान रक्षणाच्या मोहिमा, दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांची मालिका. हे सर्व राज्याच्या भविष्यावर परिणाम करणारे आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!