महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना, बच्चू कडू यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटांगणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार प्रहार केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांचा हल्लाबोल इतका तीक्ष्ण आहे की, तो विषारी सापाच्या डसण्यासारखा वाटतो. मंत्रालयाजवळील प्रहार पक्षाच्या कार्यालयावरून हा वाद फुटला आहे. कडू यांनी भाजपला ‘विषारी’ म्हणून चांगलेच झोडपले आहे. कडू यांनी म्हटले, आम्ही विष आहोत. आमच्या दुधातही विष, आमच्या पेड्यातही विष आहे, हे भाजपने दाखवून दिले.
एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर (जेडीयू) ची जागा कमी करून प्रहार पक्षाला ७०० चौरस फूट कार्यालय दिले होते. पण आता देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करत जेडीयूला पुन्हा जागा परत दिली आहे. यामुळे कडू नाराज झाले असून, भाजपची नीती ‘गरज सरो वैद्य मरो’ असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ही नीती केवळ आमच्यासाठी नाही, तर भाजपच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठीही घातक आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर त्यांनी टोलेबाज टीका केली. साप जसा दूध पाजल्यानंतरही विष सोडतो, तसा भाजप आहे. ते कधी उलटे-पलटे होऊन विष सोडतील हे कळत नाही.
Gadchiroli : जंगलातील रेड अलर्ट ग्रीन, भूपतीसह 60 साथीदारांची शरणागती
राजकीय वाद
मी भारतीय आहे असे म्हणण्यापेक्षा ‘मी भाजपाचा आहे’ असे म्हटलेच तरच तुम्ही टिकाल, अशी स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. या शब्दांतून कडूंचा राग आणि राजकीय खट्याळपणा उमटतो. शिवसेना फुटीतून शिंदेंसोबत जाऊन राज्यमंत्री झालेले कडू यांना आता महायुतीकडून धक्का बसला आहे. हे कार्यालय परत घेणे ही फक्त प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले, पण कडू यांना ते मान्य नाही. या वादामागे बिहार विधानसभा निवडणुकीची गणिते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. जेडीयूला जागा परत देण्याचा निर्णय हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) समन्वयाचा भाग असू शकतो. मंत्रालयाजवळ योगक्षेमसमोर जेडीयूला मूळ 909 चौरस फूट जागा होती.
दोनशे फूट जागा जेडीयूसाठी ठेवून उर्वरित प्रहारला दिली गेली होती. आता फडणवीस सरकारने जेडीयूला पूर्ण जागा परत करत प्रहारचे स्वप्न भंगले आहे. कडू यांचा हा प्रहार महायुतीला धोक्यात आणणारा ठरू शकतो. विशेषतः स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर. कडू यांचा हा हल्ला केवळ वैयक्तिक नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. शिंदे सरकारच्या काळात मिळालेल्या या सुखसोयी आता गमावल्या गेल्याने कडूंचा असंतोष वाढला आहे. महायुती सरकारवर त्यांनी आरोपांची फैरा झाडली असून, भाजप केवळ आपल्या लोकांसाठीच विष बनवते असे म्हणत त्यांनी नेत्यांना चिमटले. या वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले आहे.
