महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार मात्र निष्क्रीय असल्याची टीका होत आहे. फडणवीसांचा गृहखात्याचा मोह राज्यासाठी घातक आहे. त्यांनी गृहखात सोडावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गुन्हेगारीचा उच्चांक गाठला जात असताना, सरकार याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. बीडमध्ये गुंडाराज बहरला असून, रस्त्यावर सुरु असलेली गुन्हेगारी आता थेट कारागृहांत पोहोचली आहे. पोलीस प्रशासन आणि गृहविभाग हातावर हात ठेवून बसला आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारच्या आशिर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू आणि कोळसा माफिया निर्भय झाले आहेत. यामुळे गुन्हेगार बिनधास्त फिरत आहेत आणि पोलिसांनाही खुलेआम आव्हान देत आहेत. खून, दरोडे, बलात्कार यांसारख्या घटना रोजच्या रोज घडत असूनही सरकार यावर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते, पण आरोपी मोकाट फिरतात. एका केंद्रीय मंत्र्याला स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन करावे लागते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
महाराष्ट्राचा अपमानकारक अधःपात
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नमूद केले की, भाजप सरकारच्या सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचे देशभरात उदाहरण दिले जात होते. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र हा देशातील सर्वात प्रगत राज्य मानला जात होता. मात्र, मागील काही काळात, विशेषतः गृहविभागाच्या गलथान कारभारामुळे, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे. उत्तर भारतातील जंगलराजशी महाराष्ट्राची तुलना होऊ लागली आहे, ही गंभीर बाब आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार स्वतःच बीडला ‘बिहार’ आणि ‘तालिबान’ची उपमा देत आहेत. हेच स्पष्ट दर्शवते की राज्यात अराजकता माजली आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, रस्त्यावर सुरू असलेले गँगवॉर आता थेट कारागृहात पोहोचले आहे. बीडच्या कारागृहात कराड आणि गित्ते टोळ्यांमध्ये हाणामारी झाली, त्यामुळे कारागृह प्रशासनावरही ताण आला आहे. परिणामी, महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आले आहे. मात्र, ही फक्त तात्पुरती उपाययोजना असून, राज्य सरकार आणि गृहविभाग गुन्हेगारीला रोखण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.
पूर्णवेळ गृहमंत्री
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना, गृहमंत्री म्हणून फडणवीस पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करत नाहीत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. गृहविभागाच्या नेतृत्वाखाली राज्यात गुन्हेगारीला मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे फडणवीस आणि गृह विभागाचा मोह सोडावा आणि महाराष्ट्राला एक सक्षम, पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी, गँगवॉर आणि पोलिसांवरील दबाव पाहता, सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, अन्यथा काँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.