महाराष्ट्र

Bacchu Kadu : कडूंची प्रकृती खालावली, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

Farmers Protest : आंदोलन आणि दौऱ्याच्या रणधुमाळीत तापलं राजकारण 

Post View : 32

Author

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकोला दौऱ्याला विरोधाच्या काळ्या सावल्या गडद होत चालल्या आहेत.

राजकीय रणभूमीवर सत्तेचा संपूर्ण खेळ सुरू असताना एक ‘आवाज’ शरीराच्या मर्यादा ओलांडून थेट रस्त्यावर उतरला आहे. आज तो आवाज थकलेला, पण अजूनही बंडखोर आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असतानाच, शेतकऱ्यांच्या जगण्याची किंमत मागणारा बच्चू कडू यांचा लढा साऱ्यांचे लक्ष वेधतो आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. दुसरीकडे अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला प्रहार जनशक्ती पक्षाने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी आमदार बच्चू कडू यांनी 8 जूनपासून सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज चौथ्या दिवशी अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचलं आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे स्पष्ट झालं असूनही कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. अंगावर काटा आणणारे त्यांचे उद्गार, माझा बाप मेला तरी चालेल, पण नेता वाचावा अशी व्यवस्था बदलावी लागेल. यांनी आंदोलनाचं गांभीर्य स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले होते, माझा नेता म्हणजे शेतकरी राजा आहे. त्याला जिवंत ठेवणं हाच माझा धर्म आहे. या जळजळीत भाषेत त्यांनी व्यवस्थेच्या कारभारावर थेट घाव घातला.

प्रहारचा इशारा

11 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला प्रहार संघटनेकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. ‘काळे झेंडे दाखवू’ अशी थेट चेतावणी दिल्यानंतर, अकोला पोलिस प्रशासन हरकत मोडीत काढत सक्रिय झालं आहे. प्रहारचे शहराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अकोल्यातील राजकीय तापमान यामुळे अचानक वाढलं आहे.

कडू यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर तीव्र टीका केली. सोयाबीनचे दर सहा हजारांवरून चार हजारांवर आले, तुरीचे दर हजारांनी घसरले, पण कुणी बोलत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया कडू यांनी नोंदवली. त्यांनी सांगितलं की, देशात जातीय विष पेरलं जातंय, पण खऱ्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हा सगळा खेळ चाललाय. त्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरही टोकदार टीका केली. सरकारने बहिणींची मते विकत घेतली, पण शेतकऱ्यांचं आयुष्य गहाण टाकलं.

Akola : मुख्यमंत्र्यांचा दौरा घेऊन येईल विकासाचा झरा?

दोन्ही तिरांवर पेटलेल्या मशाल 

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. एकीकडे राजकीय पक्ष आपापल्या रणनीती आखत आहेत, प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहे, तर दुसरीकडे बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत आंदोलनात बसले आहेत. त्यांचा आक्रमक, पण सडेतोड शब्दांत सरकारला इशारा आहे. सरकार झुकलं नाही, तर कसं झुकवायचं ते आम्हाला ठाऊक आहे.

राज्याच्या राजकीय वाऱ्यांमध्ये सत्तेचे तरंग पसरत असतानाच बच्चू कडू यांच्या ‘अन्नत्यागाच्या’ चळवळीने प्रशासनासमोर नवा पेच उभा केला आहे. प्रकृती खालावली तरी मागण्यांवर ठाम असलेले कडू हे आता केवळ एक आंदोलक नाहीत, तर ‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज’ ठरले आहेत. आता पाहायचं इतकंच की, राजकारणाच्या गडबडीत हा आवाज पुन्हा दाबला जाईल, की सत्ताधाऱ्यांच्या मनात तरी हलकासा कंप निर्माण करेल…?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!