नक्षलवादाच्या काळोखात पित्यांना गमावलेल्या गडचिरोलीतील तरुणांना आता वर्दीच्या रूपाने न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शौर्यपुत्रांना थेट पोलिस शिपाई पदाची नियुक्ती देण्यात आली.
गडचिरोलीच्या रक्तरंजित मातीत जिथे अनेक घरं नक्षलवादाच्या दहशतीत उध्वस्त झाली, तिथे आता नव्या आशेचे रोपटं रुजत आहे. मृत्यूच्या सावलीत वाढलेली ही लेकरं आता न्यायाची मशाल घेऊन उभी राहिली आहेत, थेट वर्दी घालून. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत नक्षल हिंसेत पालक गमावलेल्या युवक-युवतींना थेट पोलिस शिपाई पदाच्या नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. गडचिरोलीच्या इतिहासात एक नवसंजीवनी भरली गेली.
गडचिरोली जिल्ह्यातील अशा अनेक कुटुंबांनी आप्तस्वकीयांना नक्षलवाद्यांच्या हिंसेत गमावले. वर्षानुवर्षे या कुटुंबांना शासनाच्या कुठल्याच मदतीचा आधार नव्हता. मात्र 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ‘गट-क’ व ‘गट-ड’ मधील पदांवर नक्षलपीडित कुटुंबातील पात्र मुलांना थेट शासकीय नोकरी द्यायची.
Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट
नव्या युगाची सुरुवात
या निर्णयाचा परिणाम आता दिसू लागला असून, 2025 मध्ये एकूण 23 नक्षलपीडित युवकांना थेट पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यापैकी दोन तरुणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या गडचिरोली दौऱ्यात नियुक्तीपत्र मिळाले. या कार्यक्रमाच्या साक्षीने, फक्त दोन तरुणच नाही तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा आत्मविश्वास उंचावला. गेल्या 3 वर्षांमध्ये एकूण 56 नक्षलपीडित युवकांना अशाच प्रकारे गडचिरोली पोलिस दलात नियुक्ती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरु असून, उर्वरित पात्र युवकांनाही लवकरच संधी मिळणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले.
सुरक्षा यंत्रणांना अधिक बळकट करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात नव्या युगाची सुरुवात होत आहे. देचलीपेठा आणि जिमलगट्टा येथे बांधण्यात आलेल्या नव्या उपपोलिस ठाण्यांच्या प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या इमारती आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा आणि ग्रामीण भागात पोलिसांच्या उपस्थितीला अधिक गतिमान बनवणार आहेत.
IAS Selection : आयएएसची खुर्ची आत ज्येष्ठांसाठी मखमली, नवोदितांसाठी काटेरी
प्रोजेक्ट उडानची यशस्वी झेप
फक्त नोकरी नाही तर स्वाभिमानाने जगण्याचा मार्गही पोलिस प्रशासनाने खुले केला आहे. ‘पोलिस दादालोरा खिडकी’ या अभिनव उपक्रमांतर्गत सुरु झालेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ मधून गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले. येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिझायनिंग, वाहनचालक प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक यांसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांत प्रशिक्षण देण्यात येते.
या केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 1 हजार 50 प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या दारांची उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही उच्च कौशल्यांची पेरणी करण्याचा हा सरकारचा प्रयत्न शतप्रतिशत यशस्वी ठरत असल्याचे यावरून दिसते.
आज जेथे नक्षलवाद्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केले, त्याच भूमीतून आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे. ही केवळ पोलिस नियुक्ती किंवा इमारतींचं उद्घाटन नाही, ही आहे एक संघर्षाची मान्यता, न्यायाची भरपाई आणि भविष्याच्या आशेची पुनर्स्थापना. वर्दीमागच्या या कहाण्या हळूहळू न्यायाचे शस्त्र बनून उगम पावत आहेत.