अतिवृष्टीच्या संकटात कोसळलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे राहिले आहेत. तात्काळ निर्णय, 2 हजार 215 कोटींची मदत आणि युद्धपातळीवरील कार्यवाहीतून सरकारने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे.
अतिवृष्टीच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सखोल आढावा घेण्यात आला. शेती, घरे आणि पशूधनाला बसलेला फटका पाहता, सरकारने तात्काळ 2 हजार 215 कोटींची मदत मंजूर केली आहे. यातील 1 हजार 829 कोटी जिल्हास्तरावर वितरित झाले असून, पुढील 8 ते 10 दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. नुकसान भरपाईचे निकष शिथिल करून अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे.
पूरग्रस्त भागात सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या अहोरात्र बचावकार्य करत असून, हेलिकॉप्टरद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच त्वरित आर्थिक सहाय्य दिले जात आहे. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनाम्यांनुसार जीआर काढले जात आहेत. स्थानिक प्रशासनाला तात्काळ मदत पुरवण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ज्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही.
Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी कृती दलाची स्थापना
युद्धपातळीवर मदतकार्य
सरकारने केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मानवीय दृष्टिकोनातूनही पावले उचलली आहेत. पूरग्रस्त भागात अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे. स्थलांतरित नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. मुख्यमंत्री स्वत: उद्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मिळेल. केंद्र सरकारकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे, पण राज्याने प्रतीक्षा न करता तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.
हवामान खात्याने 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. सरकारचे हे प्रयत्न शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना नवे उभारी देण्यासाठी पुरेसे आहेत. या कठीण काळात सरकारची साथ आणि प्रशासनाची तत्परता शेतकऱ्यांना आधार देणारी ठरेल, यात शंका नाही.