महाराष्ट्र

Sudhir Parve : भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

BJP : निष्ठावान कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांना पत्र

Author

भाजपच्या उमरेड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधीर पारवे यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून विरोध केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने विविध प्रकल्पांना गती दिली. विशेषतः नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अनेक विकास योजना साकारत गेल्या. मात्र, सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांची घसरगुंडी झाल्याने पक्षात अंतर्गत खदखद वाढू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यात आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघात तर चक्क दोन पारवे आमने-सामने आले आहेत.

भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच एक थेट पत्र लिहून पक्षातील कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. सुधीर पारवे यांनी पत्रात स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, पक्षात रात्रंदिवस झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून येणाऱ्या नेत्यांना झुकते माप दिले जात आहे. यामध्ये राजकीय सूडाचा वास असल्याचं संकेत त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला. त्यांनी थेट पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेकडे लक्ष वेधले. सुधीर पारवे 2009 आणि 2014 मध्ये भाजपकडून उमरेडचे आमदार राहिले आहेत.

Harshwardhan Sapkal : सत्ताधाऱ्यांच्या गोंगाटात पडली सायलेन्सरची शांतता

भाजपमधील अंतर्गत गडबड

2019 मध्ये त्यांचा पराभव काँग्रेसचे राजू पारवे यांनी केला होता. त्यानंतर राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून लढून पराभव स्वीकारला. पण काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि थेट भाजपमध्ये दाखल झाले. याच प्रवेशामुळे भाजपमधील असंतोष अधिक चिघळला आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत राजू पारवे यांचे समर्थक अधिक प्रभावशाली ठरत असल्याचा आरोप सुधीर पारवे यांनी केला आहे. पक्षात जुन्या कार्यकर्त्यांच्या छातीवर टाच ठेवून बाहेरून आलेल्यांना सत्तेच्या खुर्च्या दिल्या जात आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. दहा वर्ष आमदार होतो. म्हणून माझ्या भावना मी व्यक्त केल्या, असं त्यांनी नमूद केलं.

2019 पराभवानंतर सुधीर पारवे यांना 2024 निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी मिळाली. परंतु ते काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्याकडून पराभूत झाले. दरम्यान, राजू पारवे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु पक्षाने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने त्यांनी राजकीय शांतता राखली. उमरेडमध्ये आता पारवे विरुद्ध पारवे ही लढत केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता भाजपमधील अंतर्गत राजकारणाचे  प्रतीक बनले आहे. पक्षात निष्ठावान कार्यकर्ते विरुद्ध बाहेरून आलेले वॉर रूम नेते असा संघर्ष समोर येतो आहे. या संघर्षाची परिणती पक्षाच्या स्थानिक संघटनेवर व विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर कशी होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Gadchiroli : मद्यसागरात बेधडक धाड, जलदक्रियेचा वज्राघात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!