ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून मानव तस्करीविरुद्ध पोलिस व समाजाने मिळून केलेल्या प्रयत्नांमध्ये मुलांचे संरक्षण, समाज जागृती, पुनर्वसन व न्याय सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
मानव तस्करी आणि लैंगिक शोषण हे केवळ कायद्याच्या पुस्तकात नोंदवलेले गुन्हे नाहीत, ते समाजाच्या आत्म्यावर खोलवर उमटलेले ओरखडे आहेत. ती वेदना निरागस मुलांचे हसू हिरावून घेते. स्त्रियांचा सन्मान पायदळी तुडवते आणि समाजाच्या मूल्यांना हादरवते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्धची लढाई फक्त पोलिसांची जबाबदारी नाही. ती प्रत्येक संवेदनशील हृदयाची, प्रत्येक जागृत विवेकाची सामूहिक शपथ आहे. नागपूरमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ या धाडसी उपक्रमाने दाखवून दिले आहे, की जेव्हा समाज आणि शासन खांद्याला खांदा लावून उभे राहतात. तेव्हा अन्यायाच्या खोल जखमाही भरून येऊ लागतात. या संघर्षाचे आधारस्तंभ माझ्या मनाला चार खांबांसारखे वाटतात. ते म्हणजे प्रतिबंध, भागीदारी, संरक्षण आणि खटला. प्रतिबंध म्हणजे सर्वात मोठा विजय.
एखादे मूल जेव्हा अंधाऱ्या जाळ्यात अडकण्याआधीच वाचते, जेव्हा एखादा विद्यार्थी फसवणुकीला बळी पडण्याआधीच जागृत होतो. जेव्हा एखादा समाज तस्करांच्या सावलीला ओळखून सजग होतो, तेव्हा तो खरा अभेद्य विजय असतो. कायदा जन जागृतीपेक्षा मोठा नाही. कोणतेही शस्त्र शिक्षणाइतके प्रभावी नाही. भागीदारी म्हणजे या संघर्षाची खरी ताकद. पोलिस, न्यायव्यवस्था, बालकल्याण संस्था, सामाजिक संघटना, शाळा, पत्रकारिता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य जागृत नागरिक. एकट्याने कोणीही लढू शकत नाही. पण जेव्हा हे सारे हातात हात घालून उभे राहतात, तेव्हा ते एका मंदीराच्या भक्कम दगडांसारखे होतात. त्या एकात्मतेतून वाईट विरुद्ध किल्ला उभा राहतो. संरक्षण ही केवळ सुटका नाही, तर एका जखमी जीवाला पुन्हा आयुष्य देण्याची संधी आहे.
Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनाने पवार कुटुंबात ठिणगी
मानवतेची नैतिक जागृती
डोक्यावरचे छप्पर, शाळेतील बाक, सहानुभूतीचा हात, पुनर्वसनातून मिळणारी प्रतिष्ठा ही दान नव्हे, तर त्यांचे जन्मसिद्ध हक्क आहेत. खटला म्हणजे न्यायाची चमचमणारी तलवार. ज्यांनी इतरांच्या दु:खातून नफा कमावला, त्यांनी कायद्याच्या कठोर शिक्षेला सामोरे जायला पाहिजे. कारण जेव्हा अन्यायी शिक्षा भोगतो, तेव्हा निरपराध पुन्हा एकदा विश्वासाने म्हणतो, ‘हो, न्याय खरा आहे, तो जिवंत आहे.’ पण या चार स्तंभांपलीकडे एक कोवळे सत्य आहे. प्रत्येक वाचवलेलं मूल स्वतःच्या अस्तित्वाची ओळख शोधत असते. आधार कार्डाशिवाय, नोंदीत नावाशिवाय ती मुलं समाजासाठी अदृश्य राहतात. शिक्षण, आरोग्य आणि आशेपासून वंचित. त्यांना ओळख देणे ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नाही, तो त्यांच्या आयुष्याला नवा श्वास देणारा पहिला टप्पा आहे. त्याचप्रमाणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक तयार झाल्यास कोणतंही मूल सहज हरवणार नाही.
तस्करीच्या जाळ्यात अडकणार नाही. अनेक मुलांसाठी खरी मुक्ती म्हणजे कुटुंबाची ऊब. येथे CARA (केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण)आणि SARA (राज्य दत्तक संसाधन एजन्सी) संस्थांची पारदर्शक व मानवी दत्तक प्रक्रिया एका देवदूताच्या स्पर्शासारखी आहे. जेव्हा एखादे परित्यक्त मूल आईच्या कुशीत विसावते, तेव्हा त्याला केवळ घर मिळत नाही, तर भविष्य मिळले. त्याला जीवनाची नव्याने सुरूवात मिळते. ऑपरेशन शक्ती हे केवळ पोलिसांचे अभियान नाही. ते समाजाच्या नैतिक जागृतीचा आवाज आहे. आपण जर एखाद्या मुलाला नावाशिवाय, आवाजाशिवाय आणि प्रेमाशिवाय जगू दिले, तर आपण स्वतःच्या मानवतेला गाडून टाकतो. खरी सभ्यता ही संपत्ती वा सामर्थ्याने नाही, तर आपण आपल्या सर्वात असुरक्षित जीवांचे रक्षण कसे करतो यावर ठरते.
Nagpur : लोकशाहीसाठी देवाभाऊंच्या गृहनगरात काँग्रेस उतरणार रस्त्यावर
घर नसलेल्या मुलाला घर मिळाले पाहिजे. नाव नसलेल्या मुलाला नाव मिळाले पाहिजे आणि प्रेमाशिवाय असलेल्या मुलाला प्रेम मिळाले पाहिजे. हाच आपला सामूहिक संकल्प आहे. हीच आपली पवित्र जबाबदारी आहे. आपण जर शासन व समाज, राज्य व कुटुंब म्हणून एकजुटीने उभे राहिलो, तर अढळ विश्वास आहे, प्रत्येक मूल सुरक्षित राहील. प्रत्येक मूल शिक्षित होईल आणि प्रत्येक मूल सन्मानाने जगेल.
