प्रशासन

Vasudev Madavi : माओवाद्यांचा संहार करणारे राष्ट्रपती शौर्य पदकाचे मानकरी

Gadchiroli : धोक्याच्या प्रदेशात वासुदेव मडावी ठरले शौर्याचे प्रतीक

Author

गडचिरोली पोलीस दलाच्या पार्टी कमांडर वासुदेव मडावी यांचा माओवादी विरोधी 26 वर्षांच्या शौर्यपूर्ण कारकिर्दीसाठी गौरव करण्यात आला.

गडचिरोलीच्या घनदाट जंगलांमध्ये, जिथे एकेकाळी माओवाद्यांचा दहशतीचा सावट पसरलेला होता. तिथे आज शांततेचा नवा सूर उमटतोय. या परिवर्तनामागील खरा हिरो आहे, गडचिरोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी. त्यांच्या शौर्य आणि समर्पणाने माओवादाच्या काळ्या ढगांना पळवून लावले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते मडावी यांचा विशेष सत्कार करण्यात आला, जिथे त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीला सलाम ठोकण्यात आला. 1998 मध्ये पोलीस शिपाई म्हणून गडचिरोली पोलीस दलात रुजू झालेले वासुदेव मडावी यांनी आपल्या 26 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत माओवाद्यांविरुद्धच्या लढाईत अनेक पराक्रम गाजवले.

वासुदेव मडावी यांच्या धैर्य आणि नेतृत्वामुळे त्यांना तीन वेळा वेगवर्धित पदोन्नती मिळाली. आता ते सी-60 पथकाचे एक नावाजलेले पार्टी कमांडर आहेत. वयाच्या 48 वर्षीही त्यांचा उत्साह आणि निर्भय वृत्ती थक्क करणारी आहे. त्यांनी 58 चकमकींमध्ये थेट सहभाग घेत 101 माओवाद्यांना कंठस्नान घातले आणि 5 जहाल माओवाद्यांना अटक केली. त्यांच्या या कामगिरीने गडचिरोलीच्या जंगलात शांततेचा पाया रचला आहे. वासुदेव मडावी यांचा प्रवास म्हणजे एका सामान्य पोलीस शिपायापासून ते शौर्यपदक विजेत्या अधिकाऱ्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे.

Police Department : गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांचा खात्मा

चकमकीतील अभूतपूर्व कामगिरी

बोरीया कसनासूर येथे 40 माओवाद्यांना कंठस्नान घालणारी चकमक असो, मर्दिनटोला येथील 27 माओवाद्यांचा खात्मा असो किंवा नुकत्याच झालेल्या कोपर्शी चकमकीत 4 जहाल माओवाद्यांना ठार करण्याची कामगिरी असो, प्रत्येक ठिकाणी मडावी यांनी आपल्या रणनीती आणि धाडसाने शत्रूला धूळ चारली. त्यांच्या नेतृत्वाखाली सी-60 पथकाने अनेक धोकादायक अभियानांना यशस्वीपणे पार पाडले. गोविंदगाव, कतरंगट्टा, कोपर्शी-कोढूर यांसारख्या चकमकींनी त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी मडावी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

शिवाय, आणखी दोन शौर्य पदकांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत, तर महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वजण त्यांच्या धैर्य आणि नेतृत्वाचे कौतुक करतात. माओवाद्यांच्या दहशतीला आव्हान देताना मडावी यांनी केवळ शत्रूंवरच विजय मिळवला नाही, तर गडचिरोलीच्या जनतेला सुरक्षिततेची हमी दिली. वासुदेव मडावी यांचे योगदान केवळ चकमकींपुरते मर्यादित नाही. त्यांनी गडचिरोलीच्या जंगलात शांतता आणि स्थैर्य आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभव आणि रणनीतींमुळे माओवाद्यांचा प्रभाव आता जवळपास नामशेष झाला आहे.

Harshwardhan Sapkal : आश्वासनांचा गुलाल कुठे गेला?

गडचिरोली पोलीस दलातील प्रत्येक जवानासाठी मडावी हे एक प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा हा सत्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा नाही, तर संपूर्ण पोलीस दलाच्या अथक परिश्रमांचा गौरव आहे. मडावी यांच्यासारखे शूरवीर असताना गडचिरोलीच्या भविष्याला आता भयाचा स्पर्श नाही, फक्त आशा आणि शांततेचा प्रकाश आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!