महाराष्ट्र

Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या मुलांचा ‘इस्त्रो’चा प्रवास

Gadchiroli : जंगलातून अंतराळात, एका झाडाखालून सुरू झालेली झेप

Share:

Author

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील 120 विद्यार्थ्यांनी आज इतिहास रचत अवकाश संशोधनाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. नागपूरहून इस्रोच्या भेटीसाठी विमानात झेपावलेली ही स्वप्नांची भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

आकाशालाही गवसणी घालण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ठरला. एकेकाळी जंगल आणि नक्षलवादाच्या छायेखाली वाढलेल्या या मुलांनी थेट आकाशाला स्पर्श केला. इस्रोच्या अवकाश विज्ञान केंद्राच्या भेटीसाठी त्यांनी नागपूरहून बंगळुरुच्या दिशेने पहिलं ‘आकाशवाटेचं’ पाऊल टाकलं.

सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी), आणि नवेगाव (गडचिरोली) येथील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळांमधील 120 विद्यार्थ्यांनी विमानातून उड्डाण करत भारताच्या अंतराळ यशोगाथेचा साक्षात अनुभव घेण्यासाठी प्रस्थान केलं. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी बहुतेकांनी यापूर्वी रेल्वेही प्रत्यक्षात पाहिली नव्हती, काहींनी तर आपल्या तालुक्याच्या बाहेरही पाऊल टाकलेलं नव्हतं.

Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली

विद्यार्थ्यांमध्ये नवी उर्जा

या ऐतिहासिक प्रवासाच्या साक्षीदार ठरले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी जिव्हाळ्याने संवाद साधला, त्यांच्या चेहऱ्यावरच्या उत्सुकतेला हातभार लावला आणि म्हणाले, “मन लावून अभ्यास करा, जग जिंकाल.

विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक प्रवासासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड हे देखील विमानतळावर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्यात आत्मविश्वास जागवला.

Shiv Sena : स्थापना दिनाला एकनाथ शिंदे देणार ‘सरप्राइज गिफ्ट’

गगनभरारीचं मूर्तस्वरूप

या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी मांडली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तत्काळ पाठिंबा दर्शवून योजना मंजूर केली. यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी विशेष निधीची तरतूद केली.

विद्यार्थ्यांना गडचिरोली येथून नागपूरकडे बसने रवाना करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी चेतन हीवंज या सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बससह प्रवास, विमानतळावरचा अनुभव, आणि शेवटी आकाशात उड्डाण. या क्षणांमध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणि मनात स्वप्नांची दाटी होती.

Akola Politics : अकोल्यात शिंदे – ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर 

विज्ञानाचा स्फुल्लिंग

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची राष्ट्रीय संस्था असून, ती उपग्रह, प्रक्षेपण यंत्रणा, आणि आधुनिक अंतराळ तंत्रज्ञान विकासासाठी कार्यरत आहे. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीचे हे सर्वात तेजस्वी प्रतीक आहे. या संस्थेची भेट म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर प्रेरणेची दीक्षा आहे आणि हीच प्रेरणा गडचिरोलीतील या विद्यार्थ्यांच्या मनात नवी स्वप्नं रोवून गेली आहे.

ही केवळ एक भेट नव्हे, तर भविष्यकाळाचा आरंभ आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संधी दिल्यास तेही आकाशगंगा पादाक्रांत करू शकतात, हे आज सिद्ध झालं. गडचिरोलीच्या या ‘छोट्या संशोधकां’साठी ही सफर आयुष्यभर त्यांच्यात आत्मविश्वासाचा झरा वाहत ठेवेल, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!