महाराष्ट्र

Maharashtra : विधानसभेच्या व्यासपीठावरून दुमदुमला गणेशोत्सवाचा सन्मान 

Ganesh Chaturthi: टिळकांनी सुरू केलेली ज्योत आता सरकारने महोत्सवाच्या दिव्यात बदलली 

Author

‘गणपती बाप्पा मोरया’ या गजरात अवघा महाराष्ट्र दुमदुमतो आणि या भक्तिभावाने भारलेल्या सणाला आता मिळालाय एक अधिकृत गौरव. गणेशोत्सव आता केवळ आपला नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा अधिकृत चेहरा ठरला आहे.

गणपती बाप्पा आले की महाराष्ट्रात फक्त उत्सव नसतो, ती असते एक सांस्कृतिक उर्जा. ढोल-ताशांचे ताल, आरतीच्या स्वरात मिसळलेली भक्ती आणि गल्लोगल्ली नांदणारी एकात्मता, हीच तर आपली ओळख. आता या ओळखीला मिळालाय सरकारी मान. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत जाहीर केलं की गणेशोत्सव हा आता अधिकृत ‘महाराष्ट्र राज्याचा महोत्सव’ ठरवण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव केवळ धार्मिक नव्हता. तो होता स्वातंत्र्याचा जाज्वल्य झेंडा. आजही तो तितकाच जिवंत आहे. शेलार म्हणाले, हा उत्सव महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी, स्वभाषेशी आणि एकात्मतेशी निगडीत आहे. जगभर आपल्या संस्कृतीचा प्रचार होण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

शेलार म्हणाले, गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक, राष्ट्रीय स्वाभिमान, स्वभाषा आणि एकात्मतेशी संबंधित आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आत्मा असलेला हा गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला जात आहे. शेलार यांनी स्पष्ट केलं की देशात आणि जगभर गणेशोत्सवाची व्याप्ती, त्याचा सांस्कृतिक ठसा आणि महाराष्ट्राची ओळख ही वैश्विक झाली आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या राज्याची संस्कृती जगभर पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

शासकीय तोडगा

गणेशोत्सवातील पीओपी मूर्तींवर पूर्वी लादले गेलेले निर्बंध हे गणेशभक्तांसाठी त्रासदायक ठरले होते. याबाबत बोलताना शेलार म्हणाले, पूर्वीच्या सरकारने सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अतिरेक केला. मात्र आमच्या सरकारने पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करत डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास करून निर्णय घेतला. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनीही याला संमती दिली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पीओपी मूर्ती तयार करणे, डिस्प्ले करणे आणि विकणे कायदेशीर आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांना नव्या प्रेरणेने साजरा करता येईल एक उत्सव, जो केवळ आरास आणि आरतीपुरता मर्यादित न राहता, सैन्याच्या शौर्यगाथा, महापुरुषांची विचारधारा, ऑपरेशन सिंदूरसारखे राष्ट्रीय अभियान आणि समाजोपयोगी उपक्रम यांचा गाभा ठरेल.

Pravin Datke : ड्रग्सविरोधी कायदे मजबूत पण अंमलबजावणीतच फसगत

सरकारचा पाठिंबा

शेलार यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस सुरक्षा, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, प्रकाशयोजना, देखावे आणि इतर खर्चासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून दिला जाईल. पुणे, मुंबईसह राज्यातील सर्व भागांतील मंडळांना तात्काळ मदत दिली जाणार आहे. शेवटी शेलार यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं, आपल्या देखाव्यांतून सैन्य, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशाचा विकास आणि महापुरुषांचे कार्य दाखवून समाजप्रबोधनाच्या दृष्टीनेही गणेशोत्सव साजरा व्हावा. गणेशोत्सव आता फक्त आपला नव्हे, तर महाराष्ट्र सरकारचा अधिकृत सण आहे. अभिमानाचा, गौरवाचा, आणि एकतेचा प्रतीक.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!