महाराष्ट्र

IPS Archit Chandak : विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चप्प्या चप्प्यातून नजर

Akola : गणेश मंडळांसाठी एसपी अर्चित चांडक यांचा सुरक्षा रोडमॅप तयार

Post View : 36

Author

अकोला जिल्ह्यात 27ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 1750 मंडळांसाठी सीसीटीव्ही, ड्रोन स्कॅनिंग, वाहतूक नियोजन आणि महिलांच्या सुरक्षेसह सर्वंकष तयारी केली आहे.

राज्यातील सांस्कृतिक आत्मा जागवणारा गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 पासून उत्साहात साजरा होत आहे. गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घर आणि मन भक्तिमय झाले आहे. रस्त्यांवर मिरवणुकींचा गजर, मंडपात आरतीचा नाद आणि भक्तांच्या हृदयात उत्सवाचा उल्हास याने सारा महाराष्ट्र बाप्पाच्या स्वागतात मग्न आहे. ढोल-ताशांचा कर्णमधुर नाद आणि रंगीबेरंगी सजावट यांनी गल्लीबोळ नटले आहेत. पण या उत्सवाच्या रंगात रंगलेल्या वातावरणात एक खाकी वर्दीतील माणूस आपल्या कर्तव्याच्या किल्ल्यात अढळ उभा आहे. होय, आपले पोलीस. गणेशोत्सव असो वा श्रावणातील कावड यात्रा, खाकी वर्दीतील हे सैनिक आपल्या सतर्क नजरेखाली प्रत्येक उत्सवाला सुरक्षिततेचा कवच देतात. मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांचा कणा कायम ताठ आहे.

पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे प्रत्येक मिरवणूक सुरक्षितपणे मार्गस्थ होते. बाप्पा विघ्नहर्ता आहे, पण या खाकीतील सैनिकांशिवाय उत्सवाची शोभा पूर्ण होईल का? अनेकांचे म्हणणे आहे की खरा विघ्नहर्ता हा खाकी वर्दीतील माणूसच आहे, जो आपल्या कर्तव्याच्या तलवारीने प्रत्येक संकटाला छेद देतो. अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी अकोला पोलीस दलाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाने पोलिसांना उत्सवाच्या काळात सतर्क आणि सक्रिय राहण्याची प्रेरणा मिळाली आहे.अकोला जिल्ह्यातील गणेशोत्सवाला भव्य स्वरूप आहे. एकूण 1 हजार 750 गणेश मंडळे स्थापन झाली आहे. यात अकोला शहरात 438, अकोट विभागात 490, बाळापूर विभागात 343 आणि मूर्तिजापूर विभागात 479 मंडळांचा समावेश आहे.

Amol Mitkari : टाळ-मृदुंगाच्या गजरात आमदाराने केले गणरायाचे स्वागत

सीसीटीव्हीने वाढली नजर

सर्व मंडळांचे नियोजन आणि सुरक्षितता यासाठी अर्चित चांडक यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सभा घेऊन शांतता कमिटी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. एकूण 46 शांतता कमिटी सभा आणि 146 कॉर्नर मिटिंग्ज घेण्यात आल्या, ज्यामुळे उत्सवातील प्रत्येक बारीकसारीक बाबींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. चांडक यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक वळवली जाणार असून, अडथळे टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. छेडछाड आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक नेमण्यात आले आहे, जे गर्दीच्या ठिकाणी आणि मंडळांना भेटी देऊन सतर्क राहणार आहे.

अकोला शहरात 197 आणि अकोटमध्ये 164 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच मंडळांना स्वतःचे कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, गणेश मंडळ दत्तक योजनेअंतर्गत प्रत्येक मंडळासाठी एक समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. जो मंडळाच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवेल. डिजिटल सूचना बोर्ड लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे माहितीचा प्रसार जलद आणि प्रभावी होईल. अकोला पोलिसांनी यंदा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ड्रोन स्कॅनिंगची सुविधा आणली आहे. मिरवणुकीतील मुख्य मार्ग, मिश्र वस्ती आणि विसर्जन घाटांचे परिसर यांचे ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. यामुळे असामाजिक तत्त्वांवर वेळीच कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय, 2 हजार 187 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Navneet Rana : जरांगेचा आरक्षणाचा लढा आणणार बाप्पांच्या उत्सवात बाधा

भयमुक्त रूटमार्च तयारी

स्थानिक बंदोबस्तासाठी 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 21 पोलीस निरीक्षक, 108 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 हजार 362 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. बाहेरील 850 होमगार्ड सैनिक आणि एसआरपीएफची एक कंपनी आणि एक प्लाटूनही बंदोबस्तात सामील आहे. रूटमार्चद्वारे भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 361 सीसीटीव्ही कॅमेरे, 48 व्हिडिओ कॅमेरे, 7 ड्रोन कॅमेरे, 22 अस्का लाइट्स, 23 पीए सिस्टम्स, 21 नॉइज लेव्हल मीटर्स, 21 ब्रेथ अ‍ॅनालायझर्स, 60 रिफ्लेक्टर लाइट बटन्स, 60 जॅकेट्स, 6 वॉच टॉवर्स आणि 240 बॅरिकेड्स यांचा वापर बंदोबस्तासाठी होणार आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला असून, हा उत्सव आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी अकोला पोलीस दल 24 तास आपल्या सेवेत आहे. अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखालील हे खाकी सैनिक आपल्या उत्सवाला सुरक्षिततेचा रंग चढवत आहेत. जेणेकरून प्रत्येक भक्त निर्धास्तपणे बाप्पाच्या भक्तीत रंगून जाईल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!