महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या मोठ्या पराभवानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा गड कोण राखेल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. घराघरात बाप्पाचे आगमन झाले असून, भक्ती आणि आनंदाचे रंग रंगले आहेत. पण यंदा या सांस्कृतिक उत्सवात राजकीय रंगही मिसळले आहेत. याला कारणही तसेच ठरले आहे. लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग रचनेची घोषणा झाल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या चरणी एकच मागणी घेऊन उभा आहे, ‘विघ्नहर्ता, आमच्या मार्गातील अडथळे दूर कर आणि विजय मिळवून दे’.
अकोल्याच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेत गटबाजी उफाळली असताना, भाजपची अवस्थाही फारशी वेगळी नाही. अकोला पश्चिम मध्ये 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला. एकेकाळी दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अकोला हा भाजपचा अभेद्य गड मानला जायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. जनतेने भाजपच्या उमेदवाराला नाकारल्याचा संदेश स्पष्ट आहे. आता प्रश्न आहे, महापालिका निवडणुकीत भाजपचा विघ्नहर्ता ठरेल तरी कोण? या साऱ्या राजकीय खलबतांमध्ये एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे, संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे.
नव्या प्रयोगाची दिशा
अकोल्यातील भाजपचे युवा चेहरे म्हणून अनुप धोत्रे यांची ओळख आहे. त्यांच्यातील नम्रता, कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संवाद आणि माणुसकीला प्राधान्य देणारा स्वभाव यामुळे ते लोकप्रिय आहेत. दुसरीकडे, लालाजींचे चिरंजीव अनुप शर्मा यांच्याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आहे. या दोन तरुण नेत्यांना पुढे आणून भाजप नव्या दमाचा प्रयोग करू शकते, अशी चर्चा आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काही नेते कार्यकर्त्यांना गृहीत धरतात, असा आरोप होतो. अशा वेळी अनुप धोत्रे आणि अनुप शर्मा यांच्यासारखे नम्र आणि कार्यतत्पर चेहरे पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतात.
अनुप धोत्रे यांचा तरुणाईशी संवाद आणि त्यांचा अहंकार मुक्त स्वभाव यामुळे निघून गेलेले कार्यकर्ते परत येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, लालाजी यांच्या मुलावर झालेल्या अन्यायाची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या दोन अनुपांना पुढे करून भाजप ही भावना दूर करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात नवे प्रयोग करून अनेकांना संधी दिली आहे. अकोल्यातही असाच प्रयोग होण्याची शक्यता आहे. जर भाजपने ‘अनुप स्क्वेअर’ला संधी दिली, तर अहंकारी नेत्यांना धडा शिकवला जाईल आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळेल. अकोल्यातील जनता बदल हवा असल्याचा संदेश देत आहे. भाजपला पुन्हा आपला गड परत मिळवायचा असेल, तर नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवावा लागेल. अनुप धोत्रे आणि अनुप शर्मा हे गणपती बाप्पाप्रमाणे भाजपचे विघ्नहर्ता ठरतील का? याचे उत्तर लवकरच मिळेल.
