
राजकीय डावपेचांमध्ये माहिर असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक चाल खेळत गोंदिया जिल्ह्यातील आमदाराला चेकमेट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद अधिक बळकट केली आहे. पक्षात महत्त्वपूर्ण नेतृत्वबदल केले आहेत. 13 मे रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी एकूण 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करत भाजपने निवडणूक रणनितीला धार दिली. ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील भाजपचे राजकारण पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नावाभोवती फिरताना दिसत आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष असलेले आमदार फुके यांनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपला ‘पॉवर प्ले’ पुन्हा सिद्ध केला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भाजपकडून कोणताही निर्णय घेण्यात आला, तर त्याआधी डॉ. फुके यांना विश्वासात घेतले जाते. ही बाब जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीत अधिक ठामपणे स्पष्ट झाली आहे. भंडाऱ्यातील भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक हालचाली सुरू होत्या. माजी खासदार सुनील मेंढे यांनी लाख मोलाचे प्रयत्न केले. मात्र शेवटी डॉ. फुके यांच्या पसंतीच्या व्यक्तीलाच जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. यावरून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या बाबतीत डॉ. फुके यांचा शब्दच अंतिम ठरत असल्याचे सिद्ध झाले.

भाजपची ठोस रणनीती
अशीच पुनरावृत्ती गोंदिया जिल्ह्यातही झाली. गोंदियामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपली बाजू प्रबळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेगळा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा डॉ. फुके यांच्यापुढे निभाव लागला नाही. भाजपने सीता रहांगडाले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
सीता रहांगडाले या पोवार समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे ही निवड आमदार विजय रहांगडाले यांना धक्का मानली जात आहे. भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पद हे वजनदार समजले जाते. त्यामुळे या निवडीतून डॉ. फुके यांनी आमदार विजय रहांगडाले यांना थेट ‘राजकीय चेकमेट’ दिला, अशी चर्चा आहे. भविष्यात सीता रहांगडाले विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून दावा करू शकतात.
त्यामुळे डॉ. परिणय फुके हे भाजपमधील राजकारणाच्या सारीपाटावर ‘वजीर’सारखे भूमिका बजावत आहेत. कोणता मोहरा कोणत्याही घरात ‘फिक्स’ करायचा हे परिणय फुके यांचे गणित यशस्वी होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तीला जिल्हाध्यक्षपद मिळवून देत डॉ. फुके यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. ज्या समाजाला आजवर केवळ संविधानाचा दाखला देत, काँग्रेसने आश्वासनांचा खुळखुळा दिला. त्या समाजाला भाजपमध्ये सन्मान देण्याचे कार्य डॉ. फुके यांनी केले आहे.
दोन्ही जिल्ह्यांवर वर्चस्व
भंडाऱ्याच्या जिल्ह्याची निवड करून बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून न्याय मिळाल्याचा संदेश डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे. गोंदियात सीता रहांगडाले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून डॉ. फुके यांनी दुसऱ्या जिल्ह्यातही आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवून दिले आहे. परिणामी, भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांत डॉ. फुके यांना विरोध करणे म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीला विरोध करणे असल्याचे नवे राजकीय समीकरण सध्या दिसत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या बाबतीतही काँग्रेससह इतर पक्षांची राजकीय व्यूहरचना उदासीन राहिली आहे. सीता रहांगडाले यांच्या रूपाने परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्याला पहिली महिला जिल्हाध्यक्ष मिळवून दिली आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे नियुक्ती काँग्रेस सह कोणत्याही राजकीय पक्षाने गोंदिया जिल्ह्यात केली नव्हती. त्यामुळे परिणाम दादा यांनी आपल्या जिल्ह्यातील बहिणीला न्याय मिळवून दिला, असे ठाम मत भारतीय जनता पार्टीत व्यक्त केले जात आहे.