
गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे आहे जिद्द, मेहनत आणि पालकांचे अमोल योगदान.
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तिरोडा तालुक्यातील एक छोटंसं गाव ठाणेगाव. इथल्या मातीचा सुगंध आता संपूर्ण देशभर दरवळला आहे. त्यामागचं कारण म्हणजे डॉ. पंकज मनोहर पटले. एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला हा मुलगा आज भारतीय प्रशासन सेवेत (IAS) यशस्वी ठरून तिरोडा, गोंदिया आणि संपूर्ण विदर्भाचा अभिमान ठरला आहे. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून पंकज पटले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

स्वप्नं मोठी पाहा, कारण तीच तुम्हाला मोठं करतं, हे शब्द पंकज पटले यांनी आपल्या यशानंतर दिलेल्या प्रतिक्रिया समोर ठळकपणे येतात. त्यांच्या यशामागे आहे त्यांचं अपार कष्ट, जिद्द, अभ्यासावरचा विश्वास आणि पालकांचं आधारस्तंभासारखं मार्गदर्शन. डॉ. पंकज यांचे वडील एम. एम. पटले धादरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आई लता पटले या गृहीणी असून त्यांनी संपूर्ण आयुष्य घर आणि मुलांच्या भविष्यासाठी समर्पित केलं. त्यांच्या भावालाही एमबीबीएस झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर पंख मिळाले आहे. हे संपूर्ण कुटुंब एक आदर्श शिक्षित आणि प्रेरणादायी घराणं बनलं आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा
पंकज यांचे शिक्षण नवोदय विद्यालय, नवेगाव बांध येथे बारावीपर्यंत झाले. तिथल्या कठोर शिस्तीने, गुणवत्तापूर्ण शिक्षणाने आणि ग्रामीण भागातील जिद्दी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उत्तम संधींनी पंकज यांना घडवलं. पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी डॉक्टर पदवी संपादन केली, मात्र देशसेवेची ओढ त्यांना अधिक मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी प्रेरित करत गेली आणि मग सुरू झाली UPSC साठी वाटचाल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2024 परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा 1009 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमेदवारांनी ठसा उमटवला आहे. पंकज पटले यांचे हे यश केवळ वैयक्तिक विजय नाही, तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. या परीक्षेत 725 पुरुष आणि 284 महिला उमेदवारांनी यश मिळवलं आहे. त्यात 50 दिव्यांग उमेदवारांचा समावेशही आहे. देशभरातील कठीण स्पर्धेतून मार्ग काढणं हे निश्चितच एका अदम्य जिद्दीचं उदाहरण ठरतं.
पंकज पटले यांचं हे यश संपूर्ण तिरोडा तालुक्याचं आणि गोंदिया जिल्ह्याचं नाव उज्वल करतंय. एका छोट्याशा गावातून, मर्यादित साधनसामग्रीतून वाट काढत, ते आज देशाच्या सर्वात प्रतिष्ठित सेवेत पोहोचले आहेत. ही गोष्ट इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेच. पण पालकांसाठीही एक संदेश आहे की, शिक्षण आणि प्रोत्साहनच आपल्या मुलांचं भविष्य घडवू शकतं.
पंकज पटले यांच्यासह त्यांच्या आई आणि वडिलांचे देखील राजकीय नेत्यांकडून मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. तुम्ही ज्या पद्धतीने मुलांचा पाया घडवला, तीच खरी देशसेवा आहे. पंकज पटले यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. देशसेवेसाठी तुम्ही सज्ज झाला आहात, आणि आम्ही सगळे तुमच्यावर अभिमान बाळगतो, अशी प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून आली आहे.
Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप