औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विधान भवनात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ज्यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस उपाययोजनांची जोरदार मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक विधान भवनात पार पडली. पर्यावरण आणि हवामान बदल तसेच पशु संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उद्योगांच्या नियमबाह्य कारभारावर कठोर उपाययोजनांवर चर्चा झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत विशेष पुढाकार घेत प्रदूषण मुक्तीच्या दिशेने ठोस निर्णय घेतले जावेत, अशी जोरदार मागणी केली.
बैठकीत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, औद्योगिक प्रगती महत्त्वाची असली तरी ती पर्यावरणाचा समतोल राखत होणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रहिवाशांना प्रदूषणामुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे संकट संपवण्यासाठी राज्य सरकारला कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील.
कारवाईचे आदेश
बैठकीदरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करून प्रदूषणात वाढ केल्याचे स्पष्ट झाले. यावर मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सखोल माहिती घेत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याची प्रदूषणाच्या समस्येतून मुक्तता होत नाही, तोपर्यंत पर्यावरण विभाग पूर्ण लक्ष केंद्रित करून कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भर देत सांगितले की, चंद्रपूर हे महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न जिल्ह्यांपैकी एक आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे येथील जैवविविधता आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. औद्योगिक धोरण राबवताना पर्यावरणीय संतुलन जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सक्षम नियंत्रण यंत्रणा
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडून चंद्रपूरसाठी प्रदूषणमुक्तीचा संकल्प राबवण्याची मागणी केली. यासाठी कंपन्यांना कडक नियम लागू करणे, प्रदूषण नियंत्रण यंत्रणांना अधिक सक्षम बनवणे आणि जनतेच्या आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणीय समतोल याचा योग्य मेळ घालूनच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळू शकते. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे या भागातील प्रदूषण निर्मूलनासाठी सरकार अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा आहे.
