महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : राजधर्म पाळा, आरक्षण द्या

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सरकारला इशारा

Post View : 21

Author

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र प्रहार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित आरक्षण प्रश्नाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सामाजिक न्यायाच्या या लढ्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरून चालना मिळत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र प्रहार केला आहे. आरक्षणाच्या मागणीला न्याय देण्यासाठी सरकारकडे पूर्ण अधिकार असूनही मुद्दाम अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी देणे म्हणजे समाजाच्या भावनांवर पाणी फिरवण्याचा प्रकार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. आरक्षणासाठीची मागणी तीन महिन्यांपूर्वीच घोषित करण्यात आली होती. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करून समाजाच्या संयमाची परीक्षा घेत असल्याची टीका त्यांनी केली.

Jayashree Shelke : बुलढाण्यातील मतदारसंघाचा निकाल न्यायालयीन कक्षात

राजधर्माचे पालन 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे सर्व उपाय आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. प्रचंड बहुमताच्या जोरावर दिल्लीतूनच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, हा निर्णय न घेता समाजात गोंधळ निर्माण करण्याचे राजकारण सत्ताधारी भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्मरण करून दिले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळीही भाजपने ठरावाला पाठिंबा दिला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर सात दिवसांत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करतो अशी गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस आज मौन बाळगत असल्याचे ते म्हणाले.

सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्याचे आजपर्यंत पालन झालेले नाही. सागर बंगल्यावर होणाऱ्या बैठकींमध्ये आरक्षणाचा प्रश्न मांडला जातो. परंतु प्रत्यक्ष कृतीच्या ऐवजी दोषारोपांचा खेळ सुरू असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतलेली शपथ आणि गुलाल उधळून केलेल्या आश्वासनांचाही उल्लेख सपकाळ यांनी केला. मात्र, आज त्या शपथेची आठवणसुद्धा नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

Parinay Fuke : सुख-समृद्धीसाठी लालबागच्या राजासमोर आमदाराचं साकडं

जातनिहाय जनगणना 

आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. तेलंगणा आणि कर्नाटकसारख्या काँग्रेसशासित राज्यांत याची अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्रातही जर खरी इच्छाशक्ती असेल तर सत्ताधाऱ्यांनी जातनिहाय जनगणना राबवावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, असे सपकाळ यांचे म्हणणे आहे. आरक्षणासंदर्भातील गोंधळ, राजकीय सत्तेचे गणित आणि समाजाच्या भावनांशी खेळणे थांबवून ठोस निर्णय घेणे हीच खरी वेळ आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!