
महाराष्ट्रात ‘जय गुजरात’चा नारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवला आहे. या घोषणेमुळे स्वाभिमानाचा अपमान झाल्याचा आरोप करत काँग्रेसने थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजकीय वादळांनी ढवळून निघालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडवणारी घटना घडली आहे. एका शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “जय महाराष्ट्र”ऐवजी “जय गुजरात”ची घोषणा दिली आणि त्या एकाच घोषणेनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अक्षरशः घाला घातला, असे म्हणत काँग्रेसने शिंदेंवर टीका केली आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने थेट शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजकीय रणशिंग फुंकले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत शिंदेंवर हल्ला चढवला. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी प्रदेश आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराजांनी सुरतेवर धाडसी स्वारी केली. त्या महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदेसारखा गुलाम जय गुजरात म्हणतो, ही केवळ लाजीरवाणी बाब नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेली थेट गद्दारी आहे, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

Pravin Datke : भूक शमवायला ऑर्डर केला ‘टिफिन’ आला मात्र ‘टकीला’
बाळासाहेबांची शिकवण धुळीस
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, पक्ष चिन्ह गुजरातच्या मालकांनी दिलं, आणि मुख्यमंत्रीपदही त्यांनीच दिलं. ते समजून घेता येईल. पण त्यातून एकनाथ शिंदे यांनी ‘गुजराती मालका’ला खूष करण्यासाठी ‘जय गुजरात’ म्हणणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना आणि शिकवणीला थेट तिलांजली आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.
शिंदे हे गुजरातचे नाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना आपली भूमिका विसरावी लागते का? गुजरातची गुलामी करण्यासाठी एवढे लाचार होणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा व्यक्तीला उपमुख्यमंत्रिपदावर राहण्याचा कसलाच नैतिक अधिकार उरत नाही, असा थेट इशाराच सपकाळ यांनी दिला.
महाराष्ट्रावर अन्याय
हर्षवर्धन सपकाळ यांनी आर्थिक मुद्द्यांवरही शिंदेंना जाब विचारला. “वेदांता-फॉक्सकॉनसारखे अब्जावधींचे प्रकल्प महाराष्ट्रातून उचलून गुजरातला नेले गेले. त्यामुळे इथे रोजगाराच्या संधींचा अभाव निर्माण झाला. हजारो तरुणांचे भविष्य अंधारात गेले. शेतीच्या प्रश्नांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. महिलांवरील अत्याचार वाढलेत, बालकांमध्ये कुपोषण आहे. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून शिंदे गुजरातच्या तिजोरी भरण्याचे काम करत आहेत,” असा सडेतोड आरोप त्यांनी केला.
“शिंदे आज केवळ गुजरातच्या नेत्यांची स्तुती करत नाहीत, तर त्यांच्या गुलामगिरीत महाराष्ट्राच्या अस्मितेलाही तुच्छ लेखत आहेत. अमित शाह यांचा ‘वफादार शिलेदार’ होण्याच्या नादात त्यांनी स्वतःचा सारा राजकीय कणा गमावला आहे,” असा टोला सपकाळांनी लगावला.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाम भूमिका घेत शिंदेंचा राजीनामा मागितला आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा देत सपकाळांनी भाजप-शिंदे युतीवर जोरदार प्रहार केला.