गडचिरोलीत काँग्रेसच्या मशाल मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांची राख उडवली असून, मतचोरीपासून खदानीतील शोषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी न्याय पदयात्रा आणि लोकशाही बचावाचा हुंकार देण्यात आला.
राजकारणाच्या पटलावर सत्तेची चकाकी असताना, महाराष्ट्राच्या अरण्यातील एका कोपऱ्यात, आश्वासनांच्या राखेतून एक जळती मशाल पेटली आहे. ती म्हणजे शेतकरी न्याय पदयात्रा आणि मतचोरीविरोधी मशाल मोर्चा. या आंदोलनाच्या अग्रस्थानी आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी गडचिरोलीतून केंद्र व राज्य सरकारवर रोखठोक प्रश्नांची झंझावाती फैर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगी नाहीत, सत्ताभोगी आहेत. जनतेला दिलेली एकही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाहीत, अशा संतप्त शब्दांत सपकाळ यांनी मोदी-फडणवीस जोडीवर हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की, गडचिरोलीच्या खाणीतून मलई उपसण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे वारंवार येणं हे जनतेच्या हितासाठी नाही, तर खाजगी तुंबड्या भरण्यासाठी आहे.
लोकशाहीच्या मुळावर घाव
सपकाळ यांचा आरोप होता की, सुरजागडच्या लोह खदानीखाली स्टील सिटीच्या नावाने आदिवासी, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना संपवण्याचा डाव सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केलं की विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने ‘मोर्चात सहभागी होणार नाही’ असे जबाब लिहून घेणे म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव आहे. मुंबईत मराठी माणूस शोधावा लागतो, हीच परिस्थिती लवकरच गडचिरोलीत दिसेल, अशी इशारावजा भीती त्यांनी व्यक्त केली. खाणीमुळे होणारे प्रदूषण, सांस्कृतिक विस्थापन आणि रोजगारावर परप्रांतीयांचा अतिक्रमण, हे सगळं काँग्रेसच्या मते ‘विकास’ नव्हे, तर ‘धोरणात्मक विस्थापन’ आहे.
मशाल आणि सवाल
विधानसभा निवडणुकीतील मतचोरीप्रकरणी चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्च्यांचे आयोजन केले होते. 12 जून रोजी गडचिरोलीत झालेल्या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शेजारी नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, प्रतिभाताई धानोरकर, कुणाल चौधरी, अनिस अहमद, अभिजित वंजारी, सुभाष धोटे आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जमाफी मिळत नाही, घोषणा फसव्या ठरल्या. बहिणींना दोन हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन केलं, आता 500 रुपयेही देताना सरकार कचरतंय, अशी संतप्त टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच
अहमदाबाद विमान दुर्घटना
अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडिया विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात 242 जण होते. या भीषण घटनेने देशभर शोककळा पसरली आहे. त्यामुळे काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रभर होणारे मशाल मोर्चे 15 जूनपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेससाठी ही मशाल केवळ निदर्शनाची नाही, तर ही आहे लोकशाहीच्या प्रकाशासाठी पेटवलेली ज्योत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, मताच्या पवित्रतेसाठी, आणि विस्थापितांच्या न्यायासाठी उभी असलेली काँग्रेस, हे आंदोलन आहे की जागवलेली आग? या मशालीची झळ कोणाला लागते आणि प्रकाश कोणासाठी उजेडतो. हे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता ठरवेल.