महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : कोकाटेंची हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत नाही ?

Congress : फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Author

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या वायरल व्हिडिओ वरून त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राची वैभवशाली राजकीय परंपरा आणि सार्वजनिक शिस्तभानाला सध्या अवहेलनेचा टोला बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एकापेक्षा एक नमुनेदार मंत्री आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांनी फडणवीसांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले आहे, कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे का?

सपकाळ यांनी म्हटले की, कोकाटे हे विधानसभा चालू असताना ऑनलाईन रम्मी खेळतानाचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अलीकडे एका पत्रकार परिषदेत सरकार भिकारी आहे, असे विधान करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाच गालबोट लावले आहे. शेतकरी संकटात आहे, राज्यातील काही भागांत दुबार पेरणीचे संकट आहे, कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, नुकसान भरपाई नाही, आणि दुसरीकडे कृषीमंत्री मात्र बेजबाबदारपणे रम्मी खेळण्यात आणि अश्लील विधानांत मग्न आहेत. हा असंवेदनशीलतेचा आणि निर्लज्जतेचा कळस असल्याचे सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात दळवळणारं देवाभाऊ नावाचं अत्तर 

वाचवण्याची गरज काय?

कोकाटेंच्या विधानानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न करता मौन साधले आहे. यावरही सपकाळ यांनी फडणवीसांची खरमरीत शब्दांत कानउघडणी केली. मुख्यमंत्री का गप्प आहेत? कोकाटेंना वाचवण्याची काही खास गरज आहे का? की यामागे एखादी राजकीय मजबुरी आहे? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकाटे मुख्यमंत्री फडणवीसांनाही जुमानत नाहीत, आणि तरीही त्यांना पदावर ठेवले जाते, हे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणावरून सपकाळांनी असा इशारा दिला की, कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे संपूर्ण मंत्रिमंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे केवळ अयोग्य नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाविरुद्धचे आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या कळकळीने काम करणे आवश्यक आहे. पण कोकाटेंना ना गंभीरता आहे ना संवेदना. यामुळे त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नारळ देऊन घरी पाठवावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

शेवटी सपकाळ यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंवर तात्काळ कारवाई केली नाही, तर हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, हे पुन्हा अधोरेखित होईल. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, शेतकऱ्यांच्या वेदनांवर मौन, पण मंत्र्यांच्या चुकीवर संरक्षण, हेच का ‘डबल इंजिन’ सरकार? असे ते म्हणाले. संपूर्ण राज्याचे लक्ष आता यावर आहे की, मुख्यमंत्री फडणवीस या राजकीय रम्मीतून काय हातात घेतात? कोकाटेंना जाब विचारतात की पुन्हा एकदा मौन व्रताचा मार्ग स्वीकारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!