स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात जागर नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना आणि समाजाला नशेचे दुष्परिणाम समजावले गेले.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न जोरदार चर्चेत आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये या तस्करीच्या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिसांकडे सतत लक्ष वेधले जात आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत अनेक मोहीम राबवून तस्करीवर आळा घालण्याचे पाऊल उचलले आहे. या मोहिमेमुळे अनेक जणांना अटक झाली आहे. स्थानिक समाजातही नशामुक्तीच्या संदेशाचा प्रभाव जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्व विदर्भात एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह फक्त झेंड्यांच्या रंगात नाही, तर तरुणाईत जागरूकतेचे नवे किरण पसरवण्यातही दिसला. या लढाईत एक नाव विशेषत्वाने उभं राहतंय. ते म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.
डॉ. फुके यांनी भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘जागर नशामुक्ती अभियान’ राबवून तरुणांना नशेच्या विळख्यातून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. हा केवळ उपक्रम नाही, तर एक सामाजिक क्रांती आहे. जी विदर्भाच्या मातीतून उगम पावत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात पूर्व विदर्भात नशामुक्तीचा नवा सूर उमटला. भंडारा जिल्ह्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना उद्देशून डॉ. फुके यांनी नशेच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. त्यांचे शब्द केवळ मार्गदर्शन नव्हते, तर एक प्रेरणादायी मंत्र होता. ‘ना करू, ना करू देऊ, नशेपासून राहू दूर’ हा मंत्र त्यांनी तारुण्याच्या मनात रुजवला. त्यांनी तरुणांना क्रीडा, कला आणि संस्कृतीकडे वळण्याचा सल्ला दिला. जेणेकरून त्यांचे आयुष्य सकारात्मक दिशेने वळेल. त्यांच्या या संदेशाने उपस्थितांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले.
Akola Congress : ‘मत चोर, कुर्सी सोड’चा नारा पश्चिम विदर्भातही गाजला
विदर्भात नवा पायंडा
डॉ. फुके यांनी यापूर्वीही महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा ठामपणे मांडला होता. त्यांनी शासनाला जागे करत विदर्भातील या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या जागर नशामुक्ती अभियानाच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. नशा हा केवळ शरीर आणि मनाचाच नव्हे, तर कुटुंब आणि समाजाचा शत्रू आहे. तो शिक्षण आणि करिअर उद्ध्वस्त करतो. गुन्हेगारीला खतपाणी घालतो, असे सांगत त्यांनी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी सांगितली. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे, शिक्षकांनी जागरूकता कार्यक्रम राबवावेत आणि नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात पोलिस दलानेही सामाजिक जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण पटवून दिले.
भंडारा जिल्हा पोलिसांनी नशामुक्तीच्या या लढाईत खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दाखवली. डॉ. फुके यांनी पोलिसांच्या या पुढाकाराचे कौतुक करत नशामुक्त समाजाच्या निर्मितीचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय सावकारे, खासदार प्रशांत पडोळे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलिस अधीक्षक नरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक यादव, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोयाम आणि भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. डॉ. फुके यांच्या या अभियानाने भंडारा जिल्ह्यात नशामुक्तीचा एक नवा पायंडा पाडला आहे. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण केली आहे. ‘नशामुक्त भंडारा’ ही केवळ घोषणा नाही, तर एक सामाजिक आंदोलन आहे. ज्यामुळे विदर्भातील तरुण पिढीला नव्या दिशेने मार्गक्रमण करता येईल.
Devendra Fadnavis : भारताच्या सामर्थ्याची खरी झळक महाराष्ट्रातून
