
भारताला आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी वेळेत ठोस धोरणे आखण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आगामी महायुद्धं ही सीमांसाठी नव्हे, तर अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी लढली जातील, अशी अचूक भविष्यवाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 75 वर्षांपूर्वी केली होती. आजच्या जागतिक आर्थिक घडामोडी पाहता, बाबासाहेबांचे हे भाष्य अक्षरशः सत्यात उतरल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या एका विशेष व्याख्यानात, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने बोलताना त्यांनी जागतिक राजकारण आणि आर्थिक संघर्षाच्या नव्या शक्यता उघड्या पाडल्या. जमिनीसाठी लढाया इतिहास जमा होत आहेत. आता लढाई बाजारपेठेच्या ताब्यासाठी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी आर्थिक वास्तवाचे भेदक चित्र उभे करताना स्पष्ट केले की, जगाच्या पाठीवर जिथे वयोवृद्धांची संख्या वाढतेय, तिथे क्रयशक्ती घटतेय. यामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था डळमळीत होतेय. याउलट, तरुण लोकसंख्या असलेला भारत मात्र, वेगाने वाढणारी बाजारपेठ बनतो आहे.याच बदलत्या आर्थिक शक्तींच्या केंद्र बिंदूवर भारत उभा असल्याचे त्यांनी सांगितले. आता भारताने ठरवायचं आहे की, आपली बाजारपेठ कोणाला, किती आणि कशा अटींवर खुली करायची, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हे निर्णयच भारताच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग ठरवू शकतात. आपल्या भाषणात त्यांनी थेट ऐतिहासिक संदर्भ देत सरकारवर टीका केली. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करत ऐतिहासिक विजय मिळवला.

मुस्लिम समाजाचा फरक
अगदी तसाच संधीचा क्षण पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ने निर्माण केला होता, असे ते म्हणाले. पण अमेरिकेच्या ‘ट्रम्पधार्जिण्या’ धोरणामुळे, भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्याची संधी गमावली. हे युद्ध फक्त सीमारेषेपुरते नव्हते, तर ते आर्थिक वर्चस्वाशी जोडले होते. दुर्दैवाने, ती चालून आलेली संधी न वाया घालता, मोठा आर्थिक आणि राजकीय फायदा उचलता आला असता, असे त्यांचे स्पष्ट मत होते. अर्थव्यवस्थेच्या या संघर्षात देशातील सामाजिक सलोख्यालाही तडे जात आहेत. देशातील मुस्लिम समाजाला सातत्याने ‘व्हिलन’च्या भूमिकेत बसवले जाते. पाकिस्तानातील आणि भारतीय मुस्लिमांमध्ये आकाश-पाताळाचा फरक आहे. भारतीय मुस्लिमांची संत परंपरा पाकिस्तानात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, हा सामाजिक विद्वेष जर तसाच वाढत राहिला, तर याचे गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवरही होतील. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी सामाजिक सलोखाही तितकाच आवश्यक आहे. आंबेडकर यांनी चळवळीतील मौनावर जोरदार टीका केली. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा ज्वलंत विचारसरणीचा अंगार आज विझताना दिसतोय. देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक संकटांवर बोलणारे आवाज कमी झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.त्यांनी पुढे म्हटले, चळवळीने जर स्वतःच्या पिंजऱ्यात अडकून राहिले तर, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ताबा बाहेरच्या शक्तींनी घेणे फार कठीण नाही. त्यांच्या भाषणाचा शेवट या इशाऱ्यावर झाला की, देशातील आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, तर सामाजिक सलोखा आणि स्वाभिमानी आर्थिक धोरणं हाच मार्ग आहे.
Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच
प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की, जागतिक अर्थव्यवस्था एका नव्या शीतयुद्धाच्या दिशेने सरकत आहे. हे युद्ध गोळ्या-तोफांनी नव्हे, तर बाजारपेठ, गुंतवणूक आणि क्रयशक्तीच्या शस्त्रांनी लढले जाणार आहे. भारताने जर वेळीच आर्थिक आणि सामाजिक एकात्मतेचा मार्ग स्वीकारला नाही, तर या लढाईत देशाची भूमिका केवळ बाजार बनवण्याची उरू शकते.