कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल, असा रग्गड खाकी स्टाइल इशारा अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला. खाकीचा खरा रौब दाखविताच अकोल्यातील उत्सव शांततेत पार पडायला सुरुवात झाली.
सिंघममधील अजय देवगण सगळ्यांना आवडला. दबंगमधील चुलबुल पांडेने अनेकांची मनं जिंकली. गर्व चित्रपटातील एसीपी अर्जुन राणावतने बॉक्स ऑफिसवर गर्दी मिळवली. कुरूक्षेत्र चित्रपटातील संजय दत्त याची एसीपी पृथ्वीराज सिंगची भूमिकाही खूप गाजली. पोलिसगिरीमध्येही संजयने डीसीपी रूद्र आदित्य देवराजच्या रुपाने ‘कॉम्बो’चा तडका रुपेरी पडद्यावर दाखवला. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती, ती मध्ये अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना दाखविलेला खाकीचा रौब. खाकीची ताकद काय असते, हे या चित्रपटातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. त्यामुळंच लोकांना असेच डॅशिंग पोलिस अधिकारी असायला हवे, अशी इच्छा असते.
आयएएस, आयपीएस, एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरूणाई तर अशा डॅशिंग अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचते. आज महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकारी म्हणून आपली कारकीर्द अकोला शहरातूनच एएसपी म्हणून सुरू केली. त्यावेळी त्यांना रश्मी अवस्थी नावानं ओळखलं जायचं. दक्षिण भारतात सध्या राजकीय नेते असलेले व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर सिटी कोतवाली पोलिस स्टेशन चौकात रणजितसिंह चुंगडे यांनी केलेली फायरिंग आजही लोकांना आठवते. मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती अकोल्यात एसपी होते. ते देखील डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात.
मुख्यमंत्रीही चाहते
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील देवेन भारती यांचे चाहते आहेत. त्यामुळेच भारती सर्वाधिक काळ मुंबईत सहपोलिस आयुक्त राहिले. आजही आपल्या कर्तबगारीमुळेच भारती मुंबईचे पोलिस आयुक्त बनले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी भारती एकटेच एके-47 घेऊन हॉटेलमध्ये घुसले होते. देशभरातील वृत्तवाहिन्यांनी त्यांचे हे धाडस दाखविले. अर्थात देवेन भारती यांनी कधीही प्रसिद्धीचा नाद केला नाही. भारती यांच्या जोडीला असलेले तेव्हाचे पोलिस उपअधीक्षक नितीन लोहार-पवार हे देखील अकोलेकरांचे हिरो ठरले. त्यानंतर प्रचंड मोठा काळ अकोल्याला डॅशिंग अधिकारी काय असतो, हे बघायला मिळाले नाही. मात्र अकोल्यातील नागरिकांच्या आशा आता पुन्हा जागृत झाल्या आहेत.
कावड उत्सवापूर्वी अलीकडेच अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एक बैठक घेतली. त्यात शहरातील अनेकांचा समावेश होता. सामाजिक कार्यकर्ते होते. शांतता समितीचे सदस्य होते. कावड उत्सवातील कावडधारी होते. या बैठकीत चांडक यांनी एकच शब्द उच्चारला आणि सगळ्यांना खाकीचा खरा रौब पुन्हा एकदा कळला. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून चांडक यांनी सगळ्यांना आवाहन केले. कावड यात्रा, पोळा, गणशोत्सव, ईद, नवरात्र, दसरा, दिवाळी एक उत्सव आता एकापाठोपाठ आहे. या उत्सवाच्या आड काही लोक राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब चांडक यांनी हेरली.
निवडणुकीचा माहौल
अकोल्यात निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी जातीय दंगली घडल्या. त्यात एकाचा बळीही गेला. त्यामुळे दंगलींचं गाव अशी ओळख पुसलेल्या अकोल्याचं नाव पुन्हा चर्चेत आलं. लवकरच पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. उत्सवाच्या आड असामाजिक तत्वांनी डोकं वर काढू नये म्हणून चांडक यांनी घेराबंदी सुरू केली आहे. त्यामुळंच त्यांनी बैठकीत एकाच वाक्यात सगळ्यांना दम देऊन टाकला. ‘उत्सव शांततेत पार पडू द्या. आगाऊपणा कराल तर तुम्ही लोकांचा एक दिवस खराब कराल. पण मी जर वाकड्यात शिरलो तर तुमचे 15 वर्ष खराब करून टाकेल’, असा सज्जड दमच अर्चित चांडक यांनी भरला.
एसपींचा हा रौब पाहिल्यानंतर अनेकांना धडकी भरली. कावड उत्सवाच्या काळातही चांडक दोन्ही भूमिकेत दिसले. राजराजेश्वराच्या पालखीसमोर नतमस्तक होत त्यांनी ‘हे महाकाल, बना तो अकोला पुलिस को क्रिमिनल का काल’ अशी जणू प्रार्थनाच केल्याचे जाणवले. त्यानंतर पूर्ण उत्सवात ते आपल्या ‘खाकी’मध्ये ‘ऑन ड्यूटी’ दिसले.
कावड उत्सवाच्या निमित्तानं आयोजित बैठकीत काही राजकीय नेत्यांशी संबंधित लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला. चांडक यांनी हे सर्व शांतपणे ऐकून घेत फक्त नोंदी ठेवणे सुरू केले आहे. आपल्या ‘सायलेन्स’मधून त्यांनी सगळ्यांना इशारा दिलाय की एखाद्याची ‘खादी’ पाच वर्षांसाठी असू शकते पण आमची ‘खाकी’ वयाच्या 60 वर्षांपर्यंत अंगावर असते. खादीची ताकद कमी जास्त होऊ शकते, पण खाकीवरील स्टार आणि पद वाढत जाते. त्यामुळं नेत्यांच्या जिवावर उडत ‘भाईचारा’ खराब करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर खाकी कधी ना कधी आडवी येईलच. त्यामुळं अकोल्यात पुन्हा जाती-धर्माचं विष पेरण्याचं प्रयत्न करणाऱ्यांनी जरा जपून राहणं गरजेचं झालं आहे, कारण ‘पुलिस वालो की न तो दोस्ती अच्छी न ही दुश्मनी.’
