देश

Bihar Politics : ‘बिडी’च्या धुरात काँग्रेसच्या माफीचा सूर 

Congress : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया संकट

Post View : 23

Author

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे . नवीन जीएसटीवर टीका करताना पक्ष स्वतःच अडचणीत सापडले.

बिहारच्या निवडणुकीच्या धामधुमीत आणि केंद्र सरकारच्या जीएसटी दरांमधील बदलांच्या पार्श्वभूमीवर, केरळ काँग्रेसच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वादळ निर्माण केले आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये बदल करत सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण याच मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला. मात्र, हा हल्ला करताना केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून एक असंवेदनशील पोस्ट शेअर झाली, ज्याने बिहारच्या जनतेच्या भावना दुखावल्या. या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. ज्यावरून आता काँग्रेसला जाहीर माफी मागावी लागली आहे.

केरळ काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून बिहारला ‘बिडी’शी जोडणारी एक वादग्रस्त पोस्ट शनिवारी शेअर झाली. या पोस्टमध्ये जीएसटी दर कमी करण्याच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका करताना बिहारचा अपमानास्पद उल्लेख केला गेला. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की, बिहारमधील सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी थेट या पोस्टला बिहारचा अपमान ठरवत काँग्रेसला चांगलेच ठणकावले. या वादाच्या पार्श्वभूमीवर, केरळ काँग्रेसला माघार घ्यावी लागली आणि त्यांनी ती पोस्ट डिलीट करत जाहीर माफी मागितली.

Nagpur Congress : उपराजधानीत उठणार ओबीसींच्या हक्कांसाठी मोर्च्याच्या हुंकार

राजीनामा आणि धक्का

केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले गेले, ‘Bidis and Bihar start with B. Cannot be considered sin anymore.’ ही पोस्ट केंद्र सरकारच्या बिडीवरील जीएसटी दर कमी करण्याच्या निर्णयावर टीका करत होती. पण बिहारला बिडीशी जोडणे आणि त्याचा अपमानास्पद उल्लेख करणे, याने बिहारमधील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. सोशल मीडियावर ही पोस्ट वणव्यासारखी पसरली आणि काँग्रेसच्या हातून चूक झाल्याची जाणीव झाली. केरळ काँग्रेस कमेटीचे (KPCC) अध्यक्ष सीन जोसेफ यांनी ही चूक मान्य केली. आमच्या सोशल मीडिया टीमने बेजबाबदारपणे ही पोस्ट शेअर केली, असे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, पक्ष अशा टिप्पण्यांचे समर्थन करत नाही. जबाबदार व्यक्तींनी माफी मागितली आहे. या प्रकरणाने केरळ काँग्रेसच्या डिजिटल मीडिया सेलचे प्रमुख आणि माजी आमदार व्ही. टी. बलराम यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. बलराम यांनी पक्षाच्या सोशल मीडिया हँडलच्या चुकीच्या वापराची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ही पोस्ट आमच्या चुकीमुळे शेअर झाली. आम्ही ती तातडीने काढून टाकली आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ, असे सीन जोसेफ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाने बिहारच्या निवडणूक प्रचारात नवा रंग भरला आहे. सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे.

Prakash Ambedkar : सत्ता हातात द्या, आरक्षणाचा गोंधळ मिटवतो

डॅमेज कंट्रोल मोड

बिहारमधील निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने सत्ताधारी जेडीयू-भाजप आघाडीला आव्हान देण्यासाठी कंबर कसली आहे. पण या वादग्रस्त पोस्टमुळे त्यांच्याच हातातून काठी निसटली आहे. बिहारच्या जनतेने या पोस्टला आक्षेप घेतला असून, सोशल मीडियावर काँग्रेसच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. काहींनी ही पोस्ट बिहारच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाने काँग्रेसला बिहारमधील प्रचारात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांनी हा मुद्दा हायजॅक करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आता या वादातून बाहेर पडण्यासाठी डॅमेज कंट्रोल मोडमध्ये गेली आहे. पण बिहारच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही चूक त्यांना किती महागात पडेल, हे येणारा काळच ठरवेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!