नागपुरात 18 मे रोजी देशप्रेमाने ओथंबलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावात देशभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा गावात 18 मे रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साजरा केलेल्या या यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी झाले. अन्नामोड चौकातून सुरू झालेली ही यात्रा सुमारे एक किलोमीटर पर्यंत पुढे गेली. ज्यात प्रत्येक वयोगटातील, विविध धर्म आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होते. या तिरंगा यात्रेचा मुख्य उद्देश होता ग्रामपंचायत स्तरावरही देशप्रेमाचा संदेश पसरवणे. भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याचे दाखवणे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा यात्रा संपल्यानंतर एका लहान सभेत देशभक्तीची भावना आणि देशाच्या संरक्षणक्षमतेबाबत अभिमान व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, आज भारताची सैन्य क्षमता जगातील टॉप पाच देशांमध्ये येते. पाकिस्तानपेक्षा चार ते पाचपट अधिक सक्षम आहे. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान, असे फडणवीस यांनी जोरदार वक्तव्य करत, शत्रू देशाला थेट खडे बोल सुनावले.
Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?
भारताचा विजयी मंत्र
मुख्यमंत्र्यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेवरही भर दिला. त्यावेळेस लोकांनी याला जुमला म्हणत खिल्ली उडवली, पण आज भारताचे अत्याधुनिक शस्त्रास्त्र जगभर मागणी करत आहेत. ब्राह्मोस सारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाली आहे. फडणवीस म्हणाले, आपल्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण आपले संरक्षण सक्षम केले आहे. हिच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
प्रवासादरम्यान त्यांनी तुर्कीवरही टीका केली. तुर्कीने दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत मानवतेविरुद्धचा अपराध असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतीयांनी अशा देशांशी व्यवहार करणे थांबवले, हे स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय टिप्पणी
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसने काढलेली जय हिंद यात्रा राजकीय बनवू नये, सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. राहुल गांधी यांच्या सैन्याविषयी अविश्वासाच्या वक्तव्यावरही फडणवीसांनी टीका केली. ज्यावेळी तुम्ही सेनेच्या पाठीशी विश्वास दाखवाल, तेव्हाच ‘जय हिंद’ म्हणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही तिरंगा यात्रा फक्त एका पक्षाचा नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. ग्रामपंचायत स्तरावर देशभक्तीच्या ज्वाला पेटवण्यासाठी एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. आशिष देशमुख यांनी या यात्रेमध्ये सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले आणि सामाजिक एकात्मतेची छाप पाडली.
राज्यभरात तसेच खापरखेडा येथेही या यात्रेने भारताच्या शौर्याला आणि सैनिकांच्या पराक्रमाला उजाळा दिला. भारतीय जनता सैन्याच्या पाठीशी एकमेकांच्या हातात हात घालून उभी आहे, हे दिसून आले.