कोल्हापूरच्या नंदणी मठातील श्रद्धेची हत्ती माधुरी अबानींच्या वंतारा प्रकल्पात जबरदस्तीने गुजरातला हलविण्यात आल्यानंतर राजकारणाला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूरच्या नंदणी येथील जैन मठातील ‘माधुरी’ नावाच्या हत्तीणीचा गुजरातमधील जामनगर येथील अबानींच्या ‘वंतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात जबरदस्तीने हस्तांतरण केल्याच्या निर्णयाने कोल्हापूरचा धार्मिक व सामाजिक विश्वास चिरडल्याची प्रतिक्रिया सध्या भडकली आहे. माधुरी हत्तीणी केवळ एक प्राणी नव्हती. तर अनेक दशकांपासून जैन धर्मीयांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जात होती. तिच्या अनुपस्थितीमुळे नंदणी मठातील भाविक गटातील मोठ्या लोकसंख्येने भावनिक दु:ख व्यक्त केले आहे.
सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तोंड देत, वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह वंतारा टीम नंदणीमध्ये दाखल होऊन माधुरीला जबरदस्तीने गुजरातला नेले. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. पण आमच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा हा अपमान आम्ही माफ करू शकणार नाही, असे नंदणी मठातील काही लोक म्हणाले. काँग्रेस नेते तथा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अबानींच्या वनतारा प्रकल्पाच्या नावाखाली हत्तींचा अपहरण करून त्यांचा ब्रँड व्हॅल्यू वाढवण्याचा घोळ चालू आहे.
कायदेशीर प्रक्रिया विसरली
नंदणी मठातील हत्ती जे जैन परंपरेनुसार सन्मानाने वाढवले गेले होते, त्यांना आता प्राण्यांची सेवा करण्याच्या नावे गुजरातला जबरदस्तीने नेण्यात आले आहे. हा केवळ प्राणी अपमान नाही तर जैन धर्मीयांच्या संस्कृतीचा थेट छळ आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर आरोप केला की, कायदेशीर प्रक्रिया बाजूला सारून, अबानींच्या पैशाच्या जोरावर श्रद्धा आणि संस्कृतीची वाट कशी मोजली जाते हे यामध्ये दिसून येते. माधुरी हत्तीणीला मिरवणुकीत फिरवल्याबद्दल बळजबरीने हिसकावून नेले गेले. मग आता त्याच अबानी हत्तीच्या लग्नात रेस्क्यू केलेले हत्ती पाहुण्यांचे स्वागत करायला उभे केले जात आहेत.
PETA सारख्या संस्थांना यावर कधी कारवाई करायची आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, हत्तींचा वापर जाहिरातीसाठी आणि भव्य सोहळ्यांत पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी करणे हे प्राणी सेवा नाही, तर शुद्ध राजकारण आणि व्यावसायिक धंदा आहे. समाजाने डोळे उघडावेत आणि न्यायव्यवस्थेने या अन्यायाला आळा घालावा. हत्ती हे आमचे विश्वासू मित्र आहेत, जाहिरातीची वस्तू नाहीत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. या प्रकरणामुळे धार्मिक श्रद्धा, प्राणी कल्याण आणि राजकारण यामध्ये एक गुंतागुंतीची जंजाळ उभी झाली आहे. नंदणी मठातील हत्ती माधुरीचा वंताराला हस्तांतरण हा प्रकरण फार पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक लोकांमध्ये तीव्र भावना भडकलेल्या या विषयावर पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gadchiroli : प्रतीक्षा संपली, गडचिरोलीच्या हातात आले विकासाचे पोस्टकार्ड