महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे खुद्द महसूल मंत्र्यांनी मान्य केले.
महाराष्ट्रात महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ही योजना सरकारसाठी विजयाची चावी ठरली, पण त्याच वेळी वादांचा भोवरा देखील मागे लागला. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांच्या खिशात दरमहा 1 हजार 500 रुपये जमा होऊ लागले आणि लाडक्या बहिणीच्या मनावर महायुतीने ठसा उमटवला. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या योजनेचा परिणाम स्पष्ट दिसून आला. महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला तर महायुती सरकारने विजयरथ पुढे नेला.
इतकेच नव्हे तर स्वतः राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा मान्य केले की, महायुतीच्या विजयामागे लाडकी बहीण योजनाचाच मोठा हात आहे. अमरावती वरूड येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून चर्चेचा विषय निर्माण केला. या कार्यक्रमात महसूल मंत्री बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
Maharashtra : लोकांचे काम विसरले, तहसीलदार खुर्चीवर गायक बनले
राहुल गांधींवर निशाणा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. पण आम्ही तो मान्य केला. त्यानंतर लगेच आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी केली. अडीच कोटी लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला. 45 लाख शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ केले. एवढंच नव्हे, पुढील पाच वर्षे वीज बिल माफीचे आश्वासन दिले. या धोरणात्मक निर्णयांमुळे आमच्या मतांमध्ये 69 लाखांची भर पडली. महायुतीने विधानसभा निवडणुकीत तब्बल 3 कोटी 17 लाख मते मिळवली. तर काँग्रेस महाविकास आघाडीची मतसंख्या 33 लाखांनी घटली.
बावनकुळे यांनी यावर भाष्य करताना काँग्रेसला टोला लगावला. आता राहुल गांधी सांगतात की मतदार यादी चुकीची आहे. पण निवडणुकीच्या वेळी, मतदानाच्या वेळी किंवा निकाल लागल्यावर तुम्ही गप्प का होतात? आता सात महिने उलटल्यावर रडगाणे गाण्याचा हा प्रकार लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेसची ही नौटंकी फार काळ चालणार नाही. येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींत काँग्रेसला शून्यावर आणण्याचा संकल्प केला पाहिजे.महायुती सरकारच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली असली तरी आता याच योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा ताण आला आहे.
वेगवेगळ्या विभागांमधून निधी वळवण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. योजनेच्या पात्रतेबाबतही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अपात्र महिलांसोबतच पुरुषांचेही नाव लाभार्थी यादीत असल्याच्या तक्रारी झाल्या. परिणामी राज्यभरात खळबळ माजली असून विरोधकांनी सरकारवर चौकशीची मागणी सुरू केली आहे.
