मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव मदतीचे आश्वासन मिळवले. या भेटीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवरही तीव्र टीका केली आणि राज्यातील पूर परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून, पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मदत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) मार्फत भक्कम मदत मिळण्याची आशा आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस यांनी पंतप्रधानांना सादर केलेल्या निवेदनात पूरग्रस्तांसाठी भरीव मदतीची मागणी केली. पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद देत नुकसानीचा अहवाल लवकर पाठवण्यास सांगितले. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच अंतिम अहवाल केंद्राकडे सादर होईल. कारण एकदा पाठवलेला अहवाल बदलता येत नाही. सध्या प्रशासन पूर्ण नुकसानीचा अंदाज घेत आहे. तसेच, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
ठाकरेंवर टीकेचा भडिमार
फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी नमूद केले की, ठाकरे सरकारला पीएम केअर फंडासारखा निधी तयार करण्याची परवानगी मिळाली होती. परंतु त्यातील 600 कोटी रुपये कोविड काळातही खर्च झाले नाहीत. लोकांचे पैसे असताना आणि संकटात लोक मृत्यूमुखी पडत असताना एक रुपयाही खर्च न होणे लाजिरवाणे आहे, असे फडणवीस म्हणाले. ठाकरेंनी कोणाला शहाणपण शिकवावे, हे ठरवावे, अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी ठाकरे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जागतिक फिनटेक फेस्टिवल, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आणि मेट्रो-3 चा लोकार्पण सोहळा होणार आहे. यामुळे महाराष्ट्र फिनटेक क्षेत्रात अग्रेसर होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. तसेच, नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, याबाबत सकारात्मक निर्णय होईल. या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल.
