राज्यातील मराठा आरक्षणावरून पुन्हा तापलेले वातावरणावर सरकारने घेतला कडक पवित्रा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनकर्त्यांना संयम आणि संवादाचा संदेश दिला.
राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आंदोलक मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण घडामोडींवर संतप्त सूर लावत सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या हक्कांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून कायदे केले. रात्री जागून आरक्षणाची पायाभरणी केली. मात्र, त्याच व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अरेरावीची भाषा करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीस धरून नाही आणि राज्य सरकार ते सहन करणार नाही.
मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. त्यांना नवी मुंबईत पर्यायी ठिकाण निवडण्याची सूचना केली आहे. अशा स्थितीत जरांगे यांचे सरकार उलथवण्याचे वक्तव्य, तसेच वैयक्तिक टीका, हे जनतेने दिलेल्या 3 कोटी 17 लाख मतांचा अपमान असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार हे केंद्र आणि राज्यातील मजबूत नेतृत्वाखाली कार्यरत असून, ते जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
Administrative Turmoil : भंडाऱ्यात ‘ट्रान्सफर’चा सर्कस जोरात
आरक्षणासाठी योगदान ठळक
बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सरकारची कामगिरी ठळकपणे मांडली. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्याचा सखोल अभ्यास करून, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण पूर्ण करून, मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. हा कायदा विधिमंडळात सादर करण्यात आला. हायकोर्टानेही मान्यता दिली आणि सुप्रीम कोर्टात टिकला होता. मात्र, नंतरच्या सरकारच्या काळात तो कायदा रद्द करण्यात आला. बावनकुळे म्हणाले की, समाजासाठी काम करणाऱ्यांचा अपमान करणे हे अन्यायकारक आहे. जनतेच्या भावनांना धक्का पोहोचवणारे आहे.
महायुती सरकार हे लुळेपांगळे नाही, तर प्रचंड ताकदवान आहे, असे स्पष्ट करताना बावनकुळे यांनी राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या विचारात घेतल्या आहेत. त्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. बैठका, चर्चा आणि नियमांनुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाजाच्या हितासाठी सरकार काम करत आहे आणि यापुढेही करत राहील.
Akola Politics : साजिद खान पठाणांच्या उत्सव प्रेमाला भाजपने दर्शवला विरोध
आक्रमक भाषेवर रोष
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या अर्वाच्य भाषेबाबत रोष व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सन्मानावर डाग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की, मागण्या करणे ही लोकशाहीतील अधिकारप्रक्रिया आहे. मात्र अरेरावी आणि वैयक्तिक टीका अमान्य आहे. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असून, प्रत्येक मागणीला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे आंदोलनाला लोकशाही मार्गाचा आधार द्यावा, हेच योग्य ठरेल.
बावनकुळे यांनी अखेरीस स्पष्ट केले की, आंदोलनाला कायदेशीर चौकट देत संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारचा उद्देश केवळ मागण्या ऐकणे नाही, तर त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवणे आहे. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे हे प्राथमिक ध्येय आहे. अशा पार्श्वभूमीवर, आक्रमक भाषेपेक्षा संवाद आणि बांधिलकीतून प्रश्न सोडवणे हा महाराष्ट्राच्या सन्मानाचा मार्ग आहे.
