
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ड्रग तस्करीचे मोठे जाळे विणले जात आहे. या जाळ्याचा पूर्णपणे नाश करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये जोरदार आवाज उठवला आहे.
गावातील गल्ल्यांपासून ते महानगरांपर्यंत सध्या एकच चिंतेचा विषय घुमतोय. एमडी, ड्रग्स आणि अमली पदार्थांची वाढती तस्करी. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात या विषारी प्रवृत्तीने भयावह रूप धारण केलं आहे. अल्पवयीन मुले आणि तरुण वर्ग या जाळ्यात अडकत आहेत. पोलिस आणि गृह विभाग सातत्याने कारवाई करत असले तरी तस्करीच्या मूळ पाळामुळांवर ठोस कारवाई अद्याप दिसून आलेली नाही. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजत असतानाच, या मुद्द्यावर विधान परिषदेत एक प्रखर आवाज घुमला. हा आवाज होता माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा. त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि ज्वलंत प्रश्न सभागृहात लावून धरला.
डॉ. परिणय फुके म्हणाले, आज ड्रग्सचा प्रश्न फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर छोट्या शहरांमध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा यासारख्या ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये सुद्धा एमडी ड्रग्सची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शाळा आणि कॉलेज तर ड्रग्सच्या पुरवठ्याची केंद्र बनली आहेत. डॉ. फुके यांनी याकडे लक्ष वेधले की, देशात ड्रग्सविरोधात झालेल्या कारवायांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे ऐकून थोडी आशा वाटते, पण ही कारवाई पुरेशी नाही. ज्या आरोपींना अटक होते, ते वर्षभरात बेलवर बाहेर येतात आणि पुन्हा दुसऱ्या गावात, राज्यात तस्करी सुरू करतात.

फास्टट्रॅक कोर्ट गरजेचे
गुन्हेगारांची ही साखळी तोडण्यासाठी कठोर आणि कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत, असा ठाम आग्रह डॉ. फुके यांनी धरला. डॉ, फुके यांनी सभागृहात सांगितले की, महाराष्ट्रात हुक्का पार्लरच्या नावाखाली ड्रग्सचा काळा धंदा सुरू आहे. या पार्लरमधून तरुणांना व्यसनाची सवय लावली जाते आणि त्यांना गुन्हेगारीच्या मार्गावर ढकललं जातं. नागपूरमध्ये नुकताच 15 ते 17 वर्षांच्या मुलांनी खून केला. या मुलांनी एमडी ड्रग्सच्या नशेत हे कृत्य केल्याचे उघड झाले, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. ड्रग्स माफियांवर मकोका (MCOCA) सारख्या कठोर कायद्याचा अवलंब करणे आणि प्रत्येक जिल्ह्यात एसपीच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र स्पेशल टास्क फोर्स तयार करणे आवश्यक असल्याचा ठाम आग्रह डॉ. फुके यांनी व्यक्त केला.
टास्क फोर्स ड्रग्स तस्करीवर लक्ष ठेवून जलद कारवाई करू शकते, असं ते म्हणाले. आज ड्रग्स प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया इतकी धीम्या गतीने सुरू आहे की तारखेवर तारीख मिळत राहते आणि आरोपींना बेल मिळते. परिणामी, ते पुन्हा ड्रग्स तस्करीत उतरण्यात मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे ड्रग्स प्रकरणातील सर्व खटले फास्टट्रॅक कोर्टात नेले पाहिजेत, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, जे युवक या जाळ्यात अडकले आहेत त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे आणि पुनर्वसन योजना तातडीने राबवली जावी, अशीही त्यांनी सुसंस्कृत मागणी केली. अखेर, NDPS कायद्यातील कलम 27A अंतर्गत पोलिसांना अधिक कठोर कारवाईचे अधिकार दिले जावेत, असे डॉ. फुके यांनी जोरदारपणे मांडले.
Nitin Gadkari : ऑटो रिक्षा हँडलवरून, अध्यक्षाच्या स्टेयरिंगपर्यंत, केवळ भाजपातच शक्य