
खतं आणि बियाण्यांची जबरदस्तीची विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.
राज्यातील खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये खतं आणि बियाण्यांची मागणी वाढली आहे. मात्र, काही खाजगी कंपन्या या संधीचा गैरफायदा घेत बियाणं आणि खतं लिंक करून शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या विळख्यात अडकवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खतं आणि बियाण्याचं लिंकिंग करणाऱ्या आणि जास्त भावात विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे कामगार आणि अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप पूर्व नियोजन बैठकीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तक्रारींना मिळणार न्याय
खरीप हंगामासाठी अकोला जिल्ह्यात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने आखले आहे. मात्र, खतं आणि बियाण्यांच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर्षी बियाण्यांच्या गुणवत्तेवर तसेच त्याच्या किमतींवरून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही विक्रेते बियाण्यांच्या विक्रीसाठी खतं घेणं बंधनकारक करत असल्याचेही प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च करावा लागत आहे. यावर लोकप्रतिनिधींनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्याच्या खरीप पूर्व आढावा बैठकीत आमदारांनी या विषयावर कृषी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अनेक ठिकाणी कृषी विभागाकडून अपुरी माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची गरज स्पष्ट करण्यात आली.
हितासाठी कठोर निर्णय
पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट सांगितलं की, खतं-बियाण्यांचं लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कडक कारवाई करणार आहे. शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचं, योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पुढील काळात अशा काळाबाजारी कंपन्यांची माहिती मिळताच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असाही ठाम इशारा त्यांनी दिला.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आकाश फुंडकर यांनी संजय राऊत यांच्या वादग्रस्त पुस्तकावरूनही प्रतिक्रिया दिली. नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा उल्लेख करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही बालसाहित्य वाचत नसतो, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यासोबत संजय राऊत हे वाह्यात व्यक्तिमत्त्व असल्याचंही त्यांनी परखडपणे म्हटलं.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खतं-बियाण्यांचा पुरवठा झाला पाहिजे, हे सुनिश्चित करणं आता प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी ठरणार आहे. यासाठी राज्य शासनाने आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आकाश फुंडकर यांचा स्पष्ट इशारा म्हणजे भ्रष्ट आणि शेतकरीविरोधी कंपन्यांना दिलेला इशारा आहे. यातून राज्यात खरीप हंगामात गोंधळ टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.