महापारेषणची AE परीक्षा खाजगी केंद्रांमुळे पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्यवस्थेवर त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) विविध रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये विशेषतः अप्रेंटिसशिप पदांवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाट्रान्स्को AE (सहाय्यक अभियंता) 2025 परीक्षाही नियोजित होती, मात्र काही अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वी 6 जुलै 2025 रोजी होणार असलेली ही परीक्षा आता 1 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात येणार आहे. महाट्रान्स्कोने आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे.
अर्जदार आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. AE सिव्हिल भरती अंतर्गत तब्बल 134 पदांसाठी ही भरती होणार आहे. पूर्वीच्या परीक्षा केंद्रांबाबत आलेल्या तक्रारींमुळे 6 जुलैची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र नवा धक्का म्हणजे पुन्हा 1 ऑगस्टसाठीही विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्रांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब लक्षात येताच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या प्रकाराला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवले आहे.
Maharashtra : अनुकंपेची ज्योत, आता विभागनियुक्तीच्या वाऱ्यावर
खाजगी केंद्रांचा परिणाम
पटोले यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, अशा खाजगी केंद्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थेवरील अविश्वास वाढत आहे. परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आली असून, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परीक्षार्थ्यांनी महापारेषणच्या भरती परीक्षेसाठी मुख्यतः दोन ठाम मागण्या मांडल्या आहेत. त्यानुसार, परीक्षा फक्त अधिकृत TCS iON डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी आणि ती वेळेवर, पारदर्शक व गोंधळमुक्त पद्धतीने आयोजित केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी केवळ व्यवस्थेत सुधारणा करण्यापुरती नाही तर परीक्षार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुनरुज्जीवित करण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे.
खाजगी परीक्षा केंद्रांमुळे अपारदर्शकता आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांना त्यांच्या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करता येत नाही, ज्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नको, असे ठाम मत मांडत नाना पटोले यांनी शासनाला कळकळीची विनंती केली आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुस्थित, विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी त्यांनी सूचना केली आहे. MAHATRANSCO भरती म्हणजे केवळ एक परीक्षा नव्हे, तर अनेकांच्या स्वप्नांचा आधार आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर भविष्यातील परीक्षा प्रक्रियेवरचा विश्वास पूर्णतः ढासळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Amravati : मतदारसंघ बदलले, नावे बदलली, आता गावांची हाक न्यायालयीन दालनात