
महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत आवाज बुलंद केला आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झाले आहे. येत्या 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोनच दिवसांत सभागृहात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि लाडकी बहिणीच्या योजनेवरील चर्चा गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची ठामपणे बाजू मांडली. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभावीपणे भूमिका मांडणारे डॉ. परिणय फुके यावेळीही आपल्या स्पष्ट, मुद्देसूद आणि लोकहिताच्या भूमिकेमुळे सभागृहात पुन्हा एकदा लक्षवेधी ठरले आहेत.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीतील अडचणी त्यांनी अतिशय प्रभावीपणे सभागृहात मांडल्या. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी धान खरेदीमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे धान खरेदीचा वेग मंदावला आहे. खरेदीची मुदत संपत आली असताना हजारो शेतकरी अद्याप आपल्या धानाची विक्री करू शकलेले नाहीत. यामुळे आगामी खरीप हंगामात पीक घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण होण्याची शक्यता आहे. धान मोजणी प्रक्रिया सुरू असली तरी उद्दिष्ट कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदी होण्यात अडथळे येत आहेत.

Sudhr Mungantiwar : ‘ब्रिटिश पद्धतीने बांधून आणा, पण आता पुरे झालं’
भंडारा गोंदियाचे दुःख
शेतकरी वर्ग बाजारात मिळणाऱ्या कमी दरामुळे देखील त्रस्त आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रांवर त्यांच्या आशा टिकून आहेत. डॉ. परिणय फुके यांनी या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत सभागृहात आवाज उठवला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचा वेग मंदावल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र भंडाऱ्यात चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बोनस थांबवण्यात आला आहे. डॉ. फुके यांचे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि बोनसची रक्कम वेळेत त्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे.
धान खरेदीची उद्दिष्ट वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असा ठाम संदेश त्यांनी सभागृहात दिला. अधिवेशनात बोलताना डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भंडारा-गोंदियातील शेतकरी संकटात असताना मी गप्प बसू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी शासन दरबारी पोहोचवणार आणि तो मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. डॉ. फुके यांची ही भूमिका केवळ भंडारा-गोंदियातीलच नाही, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गासाठी आश्वासक ठरतेय. अधिवेशनात त्यांनी घेतलेली आक्रमक पण सकारात्मक भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णायक ठरू शकते.