राजकीय रणांगणात शब्दांचे बाण आणि आरोपांचे गोळे जोरात झडत आहेत. काँग्रेसच्या खोटे बोला, रेटून बोला या खेळीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोकदार प्रतिघात.
अमरावतीच्या राजकीय पटलावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा घणाघात केला की, विरोधकांचे शब्द जणू शून्यात हरवून गेले. ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ हा काँग्रेसचा नव्या काळातील जाहीरनामा असल्याचा घणाघात करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांनी थेट लक्ष्य केले. निवडणूक प्रक्रियेची प्रत्येक पायरी स्पष्ट असूनही, आक्षेप नोंदवायची वेळ असताना काँग्रेस नेते मुकाट राहिले. आता पराभवाची चव चाखल्यानंतर मतदार याद्यांवर शंका उपस्थित करतात, अशी टोकदार टीका त्यांनी केली.
बावनकुळे म्हणाले, आपल्या राज्यात एक लाख बुथ आहेत. एक तरी बुथ असा आहे का, जिथे काँग्रेसने आक्षेप घेतला? मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रे सील करताना कुणी काही बोलले का? नाही..! आता पराभवाची सावली पडल्यावर मात्र मतदार याद्यांचा गजर वाजवायला सुरुवात. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी 50 लाख मते मिळाली, 31 खासदार जिंकले, तेव्हा मतदार यादी बरोबर होती. तेव्हा मतदान यंत्र बरोबर होते. पण भाजप जिंकल्यावरच यंत्र बिघडते, याद्या बिघडतात, हा पराभवाचा उद्योग बंद करायला हवा.
Devendra Fadnavis : पवारांचा खुलासा म्हणजे सलीम-जावेदची स्क्रिप्ट
राजकीय दांभिकपणा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांचीही नावानिशी उदाहरणे देत खोचक हल्ला चढवला. थोरात पराभूत झाले, आक्षेप नाही. पटोले दोनशे मतांनी जिंकले, तरीही आक्षेप नाही आणि आता पराभवाचे सावट दिसताच आक्षेपांच्या गोष्टी. हा राजकीय दांभिकपणा आहे, असे बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य करताना बावनकुळे यांनी जणू ‘राजकीय भूकंपाची’ भविष्यवाणीच केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भूईसपाट होणार आहे. महायुती 51 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवेल. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना आव्हान दिले की, आताच मतदार यादी पाहून घ्या, आताच आक्षेप नोंदवा, नाहीतर निवडणुकीनंतर ‘यादी चुकली’ म्हणून रडारड नका करू.
Prakash Ambedkar : शरद पवारांच्या 160 स्वप्नांना वंचितांचा चिमटा
गुड बुक्समध्ये येण्याचा प्रयत्न
राहुल गांधींवर प्रहार करत बावनकुळे म्हणाले, या देशाची नाळ ज्यांना कधी कळलीच नाही, अशा नेत्यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये येण्यासाठी काही विदर्भातील नेते सूर लावतात. पण लोकशाहीच्या मैदानात खोट्यांची तलवार कधीच धारदार ठरत नाही. ही फक्त टीका नव्हती, तर विरोधकांच्या राजकीय आरशात दाखवलेला सत्याचा आरसा होता. तो आरसा इतका धारदार होता की, त्यात उभी असलेली प्रत्येक ढोंगाची सावली स्पष्ट दिसत होती.
राजकारणात पराभवाची कारणमीमांसा हा एक आवश्यक भाग असतो. पण त्या कारणांचा शोध वास्तवात नसून काल्पनिक दोषारोपात घेतला, तर लोकशाहीच्या आरशाला धूळ लागते. निवडणूक प्रक्रिया ही कितीही कठोर, पारदर्शक आणि वेळोवेळी आक्षेप नोंदवण्याची संधी देणारी असली तरी, पराभवाला केवळ यंत्रणा किंवा यादी जबाबदार ठरवणे म्हणजे लोकशाहीतील उत्तरदायित्व टाळणे होय. विरोधकांनी जर खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात स्थान मिळवायचे असेल, तर हल्लाबोलाच्या जोडीला ठोस पुरावे, तथ्याधिष्ठित भूमिका आणि काळजीपूर्वक नियोजनाची जोड आवश्यक आहे.
खऱ्या अर्थाने विजय
मतदारांचा विश्वास हा फक्त निवडणूक काळात नव्हे, तर संपूर्ण राजकीय आयुष्यभर जपावा लागतो. ‘खोटे बोला, रेटून बोला’ या सूत्रावर चालणाऱ्या कोणत्याही पक्षाला जनता शेवटी कठोर निकालाने उत्तर देते. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही फक्त मतांची लढत नसून, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच्या कसोटीची परीक्षा आहे. येथे आक्षेप घेण्याची संधी उघडी आहे, पण ती वापरण्याची इच्छाशक्ती आणि धैर्य ज्यांच्याकडे असेल, तेच उद्याच्या राजकीय रणांगणात खऱ्या अर्थाने विजयी ठरतील.
