महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद 2 सप्टेंबरला निकालास लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनानंतर जीआर जारी करण्यात आला. या जीआरला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बहुचर्चित शासकीय आदेश (जीआर) जारी केला. त्यानंतर अवघ्या 24 तासांतच सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अंतर्गत कलहाची ठिणगी पडली. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील बेमुदत उपोषणाला यश मिळाल्याने मराठा समाजात समाधानाचे वातावरण आहे. पण, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांनी या जीआरवर नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला.
सह्याद्री अतिथीगृहातून भुजबळांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यांनी आपल्या नाराजीचे कारण स्पष्ट करण्यास नकार दिला. या नाट्यमय घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या जीआरमुळे मराठा समाजाला कुणबी जातीच्या प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पण, भुजबळ यांच्या नाराजीमुळे सत्ताधारी गटातच तणाव निर्माण झाला आहे. भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या प्री-कॅबिनेट बैठकीत हजेरी लावली, पण मंत्रिमंडळाच्या मुख्य बैठकीला मात्र त्यांनी पाठ फिरवली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा आवश्यक
भुजबळ यांच्या या कृतीमागे जीआरमधील काही त्रुटींवर आक्षेप असल्याची चर्चा आहे, पण त्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. दुसरीकडे, भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणात ठाम भूमिका मांडत मराठा आणि ओबीसी समाजात कोणताही संघर्ष होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. परिणय फुके यांनी या जीआरला पूर्ण पाठिंबा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. हा जीआर मराठा समाजाला न्याय देणारा आहे. ज्यांच्याकडे कुणबी जातीचा दाखला आहे, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
घेतलेल्या निर्णयात कुठेही चूक नाही, असा ठाम विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला. त्यांनी भुजबळ यांच्या नाराजीला वैयक्तिक कारण किंवा गैरसमज असल्याचे सूचित करत, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, असे आवाहन केले. डॉ. फुके यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले की, मराठा आरक्षणामुळे त्यांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावले जाणार नाहीत. जीआरचा सखोल अभ्यास सुरू आहे. ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही, असे डॉ. फुके यांनी ठणकावून सांगितले. या जीआरच्या निर्मिती प्रक्रियेत सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांना विश्वासात घेण्यात आल्याचा दावा डॉ. फुके यांनी केला. त्यांनी भुजबळ यांच्या नाराजीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. हा वाद लवकरच मिटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
