देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC 2024 च्या परीक्षेत यवतमाळच्या आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशात 142 वा क्रमांक पटकावत प्रेरणादायी यश मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिच्या या झंझावाती कामगिरीने यवतमाळचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे.
केंद्र सरकारच्या विविध उच्च सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी हजारो उमेदवार कठोर मेहनत करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेला सामोरे जातात. यंदा 2024 चा अंतिम निकाल नुकताच आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर (upsc.gov.in) जाहीर झाला आहे. देशभरातून 1009 उमेदवारांनी यश मिळवले आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांनी विशेष चमक दाखवली आहे. राज्यातील 90 हून अधिक उमेदवारांनी यश मिळवत महाराष्ट्राचा झेंडा सर्वोच्च शिखरावर फडकावला आहे.
उमेदवारांच्या या यादीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे, ते यवतमाळ जिल्ह्यातील आदिबा अनम अश्फाक अहमद हिने. आदिबाने देशात 142 वी रँक मिळवत आयएएस पदाकडे वाटचाल निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ती महाराष्ट्रातून पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी ठरण्याची दाट शक्यता आहे. हे यश केवळ तिचं नाही, तर तिच्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील, विशेषतः मुस्लिम समाजातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
सातत्य आणि चिकाटीचं यश
यवतमाळसारख्या मागासलेल्या समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून आदिबाने मिळवलेलं हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. याआधीही तिने UPSC ची मुलाखत दिली होती, पण अंतिम निवड होऊ शकली नव्हती. मात्र यंदा तिच्या सातत्य, संयम आणि मेहनतीला यश मिळालं आणि ती अंतिम यादीत स्थान मिळवू शकली. ग्रामीण भागात राहूनही UPSC परीक्षेसारख्या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवणं हे खरोखरच उल्लेखनीय आहे.
यंदाच्या निकालात मुलींची सरशी लक्षणीय ठरली आहे. देशात पहिला क्रमांक शक्ती दुबे हिने पटकावला असून, दुसऱ्या स्थानावर हर्षिता गोयल आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे, जो महाराष्ट्रातून सर्वोच्च आहे. ठाण्याच्या तेजस्वी देशपांडेने 99 वा क्रमांक आणि अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे.
Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक
राज्याचा प्रभावी सहभाग
UPSC च्या अंतिम यादीत यंदा 335 सर्वसाधारण, 109 EWS, 318 OBC, 160 SC आणि 87 ST प्रवर्गातील उमेदवारांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी यश मिळवले आहे. हे राज्यातील शिक्षण, मार्गदर्शन संस्था आणि उमेदवारांच्या तयारीचं प्रतीक मानलं जात आहे. आदिबाचं यश केवळ UPSC परीक्षेपुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. आदिबाच्या यशाने सिद्ध केलं की, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर कोणतीही सीमा आडवी येत नाही.
महाराष्ट्राने यंदा UPSC 2024 मध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. आदिबा अनम अश्फाक अहमदसारख्या उमेदवारांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सुपीक भूमीतून उगवून राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. हे यश फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
