राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीचे रंग उधळले जात आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेली निवडणूक मार्गी लागल्याने प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. अशातच नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीने राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अनेक वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक आता मार्गी लागली आहे. येत्या काही महिन्यांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वांचं लक्ष महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे लागलं आहे. या सोडतीच्या घोषणेसाठी राजकीय नेत्यांनी आता थेट देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. कारण महापौरपदाचं स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात झगमगतंय. नुकतीच राज्यातील 247 नगरपंचायत आणि 147 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात 33 नगरपरिषदांपैकी 17 जागा अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतींसाठी सर्वसाधारण महिलांसाठी 38, अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7 आणि मागास प्रवर्गासाठी 20 जागा आरक्षित आहेत. या घोषणेनंतर आता महापालिकेच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विदर्भाचे राजकारण पाहता नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या प्रमुख महापालिकांमध्ये महापौरपद मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस रंगली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत महिलांचा बोलबाला असणार आहे. आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव जागांचा समावेश झाल्याने अनेक महिला उमेदवार आपलं नशीब आजमावण्यास सज्ज झाल्या आहेत. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये महापौरपदासाठी अनेक नेते स्वप्न पाहत असले, तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांसाठी ही निवडणूक नवीन संधी ठरणार आहे.
Maratha Reservation : सत्ताधाऱ्यांना दिलासा, अंतरिम स्थगिती नाकारली
महापौर बनण्याचे स्वप्न
नेत्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून आपलं राजकीय अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी आहे. विशेषतः नागपूरमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदाराचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबतही थोडी पण चर्चा सुरू आहेच. या आमदाराचे सुपुत्र सातत्याने शहरात सक्रिय दिसत असल्याने या चर्चांना बळ मिळत आहे.नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या उत्सवात राजकीय नेत्यांनी शक्तिप्रदर्शनासह देवाचा धावाही घेतला. गणपती बाप्पाच्या चरणी यशासाठी साकडे घालणाऱ्या नेत्यांनी देवीला नवसही केले की, यंदा निवडणुकीत यश मिळालं तर समाजासाठी उभे राहू. यामुळे राजकीय नेते आता देवाला साकडं घालताना दिसत आहेत. पण यंदा देव कोणाला पावणार, हे मात्र एक गूढच आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.
यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी युतीत लढवल्या जाणार की स्वबळावर, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भाजपने महायुतीतच निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला असला, तरी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वबळाची भाषा बोलणाऱ्यांवर टीका केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. यामुळे निवडणुकीबाबत उत्सुकता कमालीची वाढली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही अंतर्गत कलह असल्याने अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाहीत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर भेट देत चर्चा केली. यामुळे मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही युती प्रत्यक्षात आली तर महापालिका निवडणुकीचं चित्र आणखी रंगतदार होणार आहे. एकंदरीत, महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात आता प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांवरील बुटफेकीविरोधात काळ्या झेंड्यांची लाट
