भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा संघटनात्मक बदल केला आहे. शहर व जिल्हाध्यक्ष पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत एकाच वेळी शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष बदलले आहेत. नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नियुक्ती करून संघटनात्मक बदलांना गती दिली आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची नागपूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ग्रामीण नागपूरसाठी मनोहर कुंभारे (काटोल) आणि अनंतराव राऊत (रामटेक) या दोन नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सादर केलेल्या संघटनात्मक प्रस्तावानुसार ग्रामीण नागपूरला दोन भागांत विभागले जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याला आता पक्षश्रेष्ठींकडून मान्यता मिळाल्याने नव्या अध्यक्षांची निवड झाली आहे.
Randhir Sawarkar : मोदींच्या दीपोत्सवात राष्ट्रहिताचा शंखनाद
शहर अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
नागपूर शहर अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये आतापर्यंत अनेक गटांमध्ये रस्सीखेच सुरू होती. विद्यमान अध्यक्ष बंटी कुकडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक असल्याने त्यांचे नाव टिकेल असे वाटत होते. मात्र आमदार प्रवीण दटके यांचे नावही या शर्यतीत अचानक पुढे आले. दटके हे माजी महापौर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपने या सर्व शक्यता फेटाळत दयाशंकर तिवारी यांच्यावर विश्वास दाखवत सर्वांनाच धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. संघटनात्मकदृष्ट्या तो सांभाळणे कठीण होत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार प्रचंड असून त्यात 2 हजार 453 मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे रामटेक आणि काटोल या दोन विभागांमध्ये ग्रामीण नागपूरचे विभाजन करण्यात आले आहे. रामटेकसाठी अनंतराव राऊत, तर काटोलसाठी मनोहर कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामटेक विभागात उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा क्षेत्रांचा समावेश असेल, तर काटोल विभागात सावनेर, हिंगणा आणि काटोल विधानसभा क्षेत्रे असतील. यामुळे संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी होईल. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करता येईल.
संघटनात्मक पुनर्रचना
भविष्यात, म्हणजेच 2029 पर्यंत नागपूर शहरातील लोकसंख्या आणि मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोनपेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन भाजपने आधीच दोन ग्रामीण अध्यक्ष नेमले आहेत. या निर्णयामुळे फक्त संघटनात्मक कार्यक्षमता वाढणार नाही. तर सामाजिक आणि जातीय समीकरणं जुळवण्यातही भाजपला मदत होणार आहे. काटोल व रामटेक या मुख्यालयांमुळे कार्यकर्त्यांना ठोस दिशा मिळणार असून गावपातळीवर पक्षाची पकड अधिक बळकट होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांना तेथील गरजांची पूर्ण जाण आहे. त्यांनी नड्डांकडे केलेल्या प्रस्तावामुळे नागपूर भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेला अधिकृत स्वरूप मिळाले आहे. या निर्णयांमुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अधिक मजबूतपणे उतरू शकेल, अशी पक्षाच्या वरिष्ठांची धारणा आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. गावोगावी संघटन अधिक परिणामकारकपणे काम करू लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपची ही भाकरी फिरवण्याची रणनीती भविष्यात किती प्रभावी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
