पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा नागपूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर नागपुरात संतापाचा उद्रेक झाला आहे. या क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विविध हिंदुत्वनिष्ठ आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला. देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात आंदोलने, कँडल मार्च, श्रद्धांजली सभांनी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.
विश्व हिंदू परिषद, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तसेच जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राच्या नागपूर शाखेने स्वतंत्रपणे पण एकाच सुरात दहशतीच्या विरोधात आवाज उठवला. नागपुरात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनांत सहभाग घेतला.
Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप
राष्ट्रव्यापी निषेध
शिंदे गटाच्या शिवसेनेनेही या घटनेचा तीव्र निषेध केला. जिल्हाप्रमुख सुरज मोहन गोजे यांच्या नेतृत्वात गांधी पुतळा, चितारओळ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. भगवे झेंडे, घोषणाबाजी, आणि संतप्त नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
विश्व हिंदू परिषदेने 25 एप्रिलला देशभरात एकाच वेळी मंदिरांमध्ये निषेध आणि श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील मंदिर अर्चक आणि पुरोहित संपर्क विभागाचे पदाधिकारी गोविंद शेंडे आणि अनिल सांबरे यांनी शहरातील सर्व मंदिरांमध्ये एकत्रितपणे आरती व श्रद्धांजली सभांचे आवाहन केले आहे.
आंदोलनाने शहर हादरले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने संविधान चौकात शांततापूर्ण कँडल मार्च काढत मृतांप्रती श्रद्धांजली वाहिली. मेणबत्त्यांच्या उजेडात अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी नागरिकांनी या घटनेचा निषेध केला. सक्करदरा चौकात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. या सर्व उपक्रमांमधून नागपूरकरांनी एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश दिला.
राजकीय भिन्नतेचा विसर पाडत सर्व संघटना एकत्र आल्या. दहशतवादाविरुद्धचा लढा ही केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाची सजगता आणि संघटितता हाच खरा मार्ग आहे, हे या आंदोलनांतून अधोरेखित झाले.
