प्रशासन

Nagpur : खोट्या नंबर प्लेट्स, हातात धारदार शस्त्र, नेमकं चाललंय तरी काय

Night Terror : मुख्यमंत्र्यांच्या गृहनगराला गुन्हेगारीचे लागले ग्रहण

Post View : 20

Author

शांततेत नांदणारे नागपूर शहर आता गुन्हेगारीच्या सावटाखाली झाकले गेले आहे. हे चित्र गेल्या काही महिन्यांपासून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

नागपूर, देशाच्या मध्यभागी वसलेले हे शांततेचे शहर, नेहमीच आपल्या सौम्य वातावरणासाठी आणि सांस्कृतिक वैभवासाठी ओळखले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर असलेले हे शहर कायमच शांततेचा संदेश देतात. पण, गेल्या काही महिन्यांपासून नागपूरच्या या शांततेच्या चादरीला गुन्हेगारीच्या कात्रीने टाचणी मारली आहे. कधी धर्माच्या नावावर दंगल, तर कधी रस्त्यावर बेदरकारपणे फिरणाऱ्या बिना नंबर प्लेटच्या गाड्या. नागपूरच्या रस्त्यांवर आता गुन्हेगारीचा तमाशा रंगतोय आणि यामुळे शहरवासीयांच्या मनात धडकी भरली आहे.

गुरुवारच्या (4 सप्टेंबर रोजी ) रात्री, शांतीनगर परिसरातील विनायकराव देशमुख हायस्कूल जवळील एनआयटी गार्डन परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. सशस्त्र तरुणांचा एक टोळका, हातात हत्यारे घेऊन, दुचाकींवरून रस्त्यावर धुडगूस घालत होता. रस्त्याने जाणाऱ्यांना धमकावणे, वाहनांची तोडफोड करणे आणि परिसरात दहशत पसरवणे, असा हा सारा खेळ कॅमेऱ्यात कैद झाला. कॅमेरात स्पष्ट दिसतेय की, या तरुणांनी हेल्मेट घातलेले नाही. यावरूनही सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा होतो. पण त्याहूनही गंभीर बाब म्हणजे त्यांच्या गाड्यांना नंबर प्लेट्सच नव्हत्या. खोट्या किंवा नसलेल्या नंबर प्लेट्ससह रस्त्यावर बेदरकारपणे फिरणारी ही मंडळी नेमकी कोण आणि त्यांचा हेतू काय, हा प्रश्न आता नागपूरकरांना सतावतोय. 

Prakash Ambedkar : भाजपचा जीआर म्हणजे कागदी घोडे

नागरिकांचा संताप उफाळला

अवघ्या काही दिवसांपूर्वी, संध्याकाळी शांतीनगर परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढत सुरक्षा व्यवस्थेचा डंका वाजवला होता. पण, या घटनेने पोलिसांच्या दाव्यांना हवेतच विरजण केले. रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या या गुंडांनी पोलिसांच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. स्थानिक रहिवासी आता विचार करताहेत, जर पोलिसांच्या नाकावर टिच्चून असा धुडगूस घातला जात असेल, तर खरंच शहर सुरक्षित आहे का? गेल्या काही महिन्यांपासून नागपूरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. कधी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल, तर कधी बिना नंबर प्लेटच्या गाड्यांवरून गोंधळ. हा सारा प्रकार शहराच्या शांततेच्या सलोख्याला आव्हान देणारा आहे. या घटनांमुळे नागपूरच्या रस्त्यांवर आता भीतीचे  सावट पसरले आहे.

रात्रीच्या वेळी बाहेर पडणेही नागरिकांना धोक्याचं वाटू लागलंय. विशेषत: शांतीनगर सारख्या परिसरात, शाळा-महाविद्यालये आहेत, तिथे अशा घटना घडणे म्हणजे थेट शहराच्या सुसंस्कृत चेहऱ्यावरचा काळा डाग. व्हिडीओ फुटेजमध्ये दिसणारी ही बेदरकार तरुणांची टोळी, हातात धारदार शस्त्र  घेऊन गाड्यांवर हल्ले करताना दिसली. त्यांच्या गाड्यांना नंबर प्लेट्स नसणे, हा तर थेट कायद्याची पायमल्ली करणारा प्रकार. यामुळे प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित होताहेत की, नागपूरच्या शांततेचा हा बुरखा फाटण्याची वेळ आली आहे का?नागपूरकर आता वैतागले आहेत. एकीकडे शहराची शांततेची ओळख आणि दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीचा धोका, यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Parinay Fuke : संवादातून साधला सामाजिक समतोल

नंबर प्लेटच्या नसलेल्या गाड्यांचा सुळसुळाट, खोट्या नंबर प्लेट्सचा खेळ आणि रस्त्यावर माजवलेला धुडगूस, यावर आता कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी केवळ रूट मार्च काढून नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करून या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी अपेक्षा नागपूरकर व्यक्त करताहेत.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!