पूर्व विदर्भातील मान्सूनपूर्व तयारीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून व्यवस्थापन याबाबत ठोस निर्देश देण्यात आले.
पूर्व विदर्भातील मान्सूनपूर्व तयारीला आता वेग मिळाला आहे. मुसळधार पावसाच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज होऊ लागल्या आहेत. यंदा हवामान विभागाने वेळेआधी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचालींना गती मिळाली आहे. 19 मे रोजी (सोमवारी) नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहे. प्रशासनाने योजना आखल्या आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. सर्वाधिक लक्ष धरणांच्या जलस्तरावर केंद्रित करण्यात आले. विदर्भात एकूण 378 धरणे असून त्यामध्ये 16 मोठी, 42 मध्यम आणि 320 लहान धरणांचा समावेश आहे. गोसेखुर्द, अपर वर्धा, इसापूर, संजय सरोवर आणि मेडिकट्टा या प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचे आदेश दिले गेले. मुसळधार पावसामुळे अचानक जलप्रवाह वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
होर्डिंग्जची सुरक्षा पाहणी
पूर नियंत्रणासाठी धरणांमधील पाण्याचा विसर्ग पूर्वीच नियोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जलसंपदा विभागासह केंद्रीय जल आयोगाचे सहकार्य घेण्यावर भर दिला गेला.संकटकाळात नागरिकांपर्यंत अचूक आणि वेळीच माहिती पोहोचावी यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्याचे ठरवण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याने यासाठी विकसित केलेला डीडीएमए चॅटबॉट आणि साथीदार अॅप इतर जिल्ह्यांनीही वापरावेत, असे निर्देश देण्यात आले. शिवाय केंद्रीय जल आयोगाच्या फ्लडवॉच अॅपचा प्रभावी वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
यामध्ये एक विशेष बाब म्हणजे नागपूर शहरात असलेल्या धोकादायक होर्डिंग्ज आणि बॅनर्सची स्थिती तपासून ती वेळेत हटविण्याचे आदेश. पावसात ढगफुटी किंवा वादळी वाऱ्यामुळे होणारे अपघात रोखण्यास हे महत्त्वाचे ठरते.बिदरी यांनी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील दूरस्थ भागात विशेषत: गरोदर महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने आधीच सुरक्षित स्थळी हलविण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, मागील काही वर्षांतील धरण आणि जलाशय परिसरात झालेल्या अपघातांच्या ठिकाणी सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले गेले.
संयुक्त आपत्ती नियोजन
मान्सून काळात साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि पोलीस विभाग यांचे एकत्रित समन्वय आवश्यक असल्याचे बैठकीत दिसून आले.या बैठकीला नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, हवामान विभागाचे वैज्ञानिक आर. बालासुब्रमण्यम, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या यंत्रणांनी मान्सूनपूर्व तयारीची सविस्तर माहिती सादर केली. प्रत्येक विभागाने घेतलेल्या उपाययोजना व तयारीचा आढावा घेण्यात आला.