काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचं वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये अडकून पडलं आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्यांनी तीच जागा पाहिल्याने कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काश्मीरच्या सौंदर्यानं भारावून गेलेलं नागपूरचं वाघमारे कुटुंब सध्या दहशतीच्या छायेखाली अडलं आहे. श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये सात सदस्यीय वाघमारे कुटुंब अडकून पडलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पहलगाममध्येही पर्यटन केलं होतं. दुर्दैवानं, त्याच ठिकाणी नुकताच दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे.
हल्ल्याने काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल आहे. काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सैन्याने संपूर्ण भागात तपासणी सुरू केली आहे. आकाशात लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि विमाने सातत्याने गस्त घालत आहेत. रस्तोरस्ती जवानांची कडेकोट नजर आहे.
Chandrashekhar Bawankule : वर्ध्यात जिल्हाध्यक्षपदासाठी गट-संघर्ष उफाळला
भीतीचं वातावरण
श्रीनगरहून प्रसार माध्यमांची व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना पृथ्वीराज वाघमारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य मांडले. दोन दिवसांपूर्वीच आम्ही पहलगाममध्ये होतो. तेव्हा वातावरण एकदम शांत होतं. मात्र आता प्रत्येक ठिकाणी जवान दिसत आहेत. आमच्यासोबत महिला आणि लहान मुलं असल्यामुळे आम्ही फार घाबरलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. पृथ्वीराज वाघमारे हे नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परिसरात राहतात. त्यामुळे त्यांनी स्वतः वाघमारे कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाली आहे. टुरिस्ट आणि सुरक्षा यंत्रणा यांना लक्ष्य करून घातपाताचे प्रकार घडवले जात आहेत. विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये अशा घटना अधिक घडताना दिसत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाघमारे म्हणाले की, आम्हाला सध्या इथून बाहेर पडण्याची संधी मिळावी आणि सुरक्षितपणे नागपूरला परतता यावं, हीच सध्या आमची प्रार्थना आहे, असं सांगत वाघमारे कुटुंबियांनी आपली व्यथा व्यक्त केली.
आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे स्वर्गासारखं काश्मीर आज पुन्हा एकदा धोक्याच्या सावटाखाली आहे. सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी योग्य त्या उपाययोजना करून पर्यटकांचा विश्वास परत मिळवणं हीच काळाची गरज आहे. आतंकवाद्यांच्या या हल्ल्यांमुळे भारताला कठोर असे पावले उचलण्याची अत्यंत गरज आहे.
