महाराष्ट्र

Girish Vyas : माजी विधान परिषद सदस्यांच्या बॅगेवर चोराट्यांचा डल्ला

Nagpur : तेल गळतीचा बहाणा करत रसायनाचा वार

Post View : 54

Author

नागपूरच्या रस्त्यावर भरदिवसा माजी विधानपरिषदेच्या सदस्यासोबत दोन अज्ञात चोरट्यांनी पैसे लुटण्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नागपूर शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या दारोडकर चौकात 9 जून रोजी (रविवारी) भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. माजी विधान परिषदेचे सदस्य (MLC) आणि भाजप नेते गिरीश व्यास यांना दोन अज्ञात चोरट्यांनी निशाणा बनवत तब्बल 50 हजार रुपयांची रोकड लुटली. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार अगदी हुशारीने आणि काही सेकंदांत घडवून आणण्यात आले. शहरात सध्या उष्णतेच्या लाटेमुळे रस्त्यांवर फारशी गर्दी नसतानाही गुन्हेगारांनी भर दिवसा इतक्या धाडसाने हा गुन्हा केल्याने नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गिरीश व्यास हे पत्नीसमवेत गाडी चालवत असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी व्यास हे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्या पत्नी मागच्या सीटवर होत्या. दारोडकर चौकात दोन पायी जाणाऱ्या व्यक्तींनी व्यास यांच्या गाडीच्या दिशेने इशारा करत गाडी थांबवण्याची विनंती केली. आपल्या गाडीतून तेल गळत आहे असे सांगत त्यांनी व्यास यांची उत्सुकता वाढवली. गाडी बाजूला लावून व्यास यांनी गाडीच्या खाली पाहण्यासाठी खाली वाकल्यावर अचानकपणे एका चोरट्याने त्यांच्या डोळ्याजवळ रसायन फवारले. यामुळे काही काळासाठी त्यांची दृष्टी कमी झाली आणि गोंधळ निर्माण झाला.

Bacchu Kadu: बलिदान देणार, पण सरकारला झुकवणार

नागपूरकरांमध्ये चिंता वाढली

संधीचा फायदा घेत दुसऱ्या गुन्हेगाराने गाडीचा दरवाजा उघडून गाडीत ठेवलेली 50 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. दोन्ही आरोपी काही क्षणांतच घटनास्थळावरून फरार झाले.गिरीश व्यास यांनी त्वरित लकडगंज पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला असून वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापनांतील CCTV फुटेज तपासले जात असून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हा गुन्हा पूर्वनियोजित वाटतो. आरोपींनी व्यास यांना विशिष्ट पद्धतीने थांबवून ही संधी साधली आहे. रसायन फवारण्याचा प्रकार यापूर्वी नागपूरमध्ये फारसा दिसून आला नव्हता, त्यामुळे तपास अधिक सखोल केला जात आहे. या घटनेमुळे नागपूरकरांमध्ये सार्वजनिक सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. दिवसा दाट वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारे उच्च-प्रोफाइल व्यक्तीला लक्ष्य केल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक व्यापाऱ्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त करत अधिक गस्त आणि पोलिसांची उपस्थिती वाढवण्याची मागणी केली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून लवकरात लवकर आरोपींना गजाआड करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Parinay Fuke : तीन दशकांच्या काळोखाला न्यायाचा प्रकाश

पोलीसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या फसव्या क्लृप्त्यांना बळी न पडता, अशा घटनांबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!