गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेला वाहतूक गोंधळ अद्यापही कमी झालेला नाही. त्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी परत एकदा नवीन तोडगा काढला आहे.
नागपूर म्हणजे ऑरेंज सिटी, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी आणि आता विकासाची नवी उंची गाठणारी नगरी. गगनचुंबी इमारती, चकाचक रस्ते आणि मेट्रोचे जाळे यांनी सजलेले हे शहर आता नव्या दिशेने झेप घेत आहे. पण या चकचकीत चित्राला एक काळा डाग लागलाय. तो म्हणजे वाहतुकीचा अराजक गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात वाहतुकीची शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण रस्त्यांवरील गोंधळ काही कमी होत नाही. चुकीच्या दिशेने धावणारी वाहने, ट्रिपल सीटवर उड्या मारणारी तरुणाई आणि वेगाच्या नशेत बेदरकारपणे गाड्या हाकणारे चालक, यामुळे नागपूरकर हैराण झालेत.
अपघातांचे वाढते प्रमाण आणि मालमत्तेचे नुकसान यांनी हा प्रश्न आता गंभीर बनलाय. याच आव्हानाला तोंड देण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी (ट्रॅफिक) लोहित मतानी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी भारी वाहने आणि बाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर नो-एंट्रीचा कडक फर्मान काढला. पण तरीही रस्त्यांवरील गोंधळ कमी होत नसल्याने त्यांनी आता एक नवा डाव खेळला आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगच्या जागेची कमतरता यामुळे बाजारपेठेत आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने आणि त्यामुळे होणारा त्रास याला आळा घालण्यासाठी मतानी यांनी एक भक्कम योजना आखली आहे. 22 ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या नव्या अधिसूचनेने नागपूरच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
लोहित मतानींचा मास्टरप्लॅन
लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी शहरातील 10 ट्रॅफिक झोनमध्ये तब्बल 148 नो-पार्किंग स्पॉट्स निश्चित केली आहेत. याशिवाय, 80 पार्किंग स्ट्रेच निश्चित करून वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या सर्कल्सवर वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. सीताबर्डीमध्ये सर्वाधिक 32 नो-पार्किंग क्षेत्रे जाहीर झाली आहेत. तर अजनी (17), कॉटन मार्केट (20), इंदोरा (13), सदर (14), लकडगंज (12), एमआयडीसी (12), सक्करदरा (10), कामठी (7) आणि सोनेगाव (11) येथेही नो-पार्किंग क्षेत्रे निश्चित झाली आहेत. या योजनेत वेग मर्यादेचाही समावेश आहे. एमआयडीसी (11), सदर (6), सक्करदरा (11), इंदोरा (9), अजनी (4) आणि कामठी (3) येथे वेग मर्यादा क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. यामुळे शहरात एकूण 44 वेग-नियंत्रित स्ट्रेच तयार झाले आहेत. ही अधिसूचना म्हणजे नागपूरच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक ठोस पाऊल आहे.
लोहित मतानी यांनी सांगितले की, वाहनचालकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंग आणि नो-पार्किंगचे फलक, तसेच पांढरे पट्टे लावणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल. लोहित मतानी यांच्या या पुढाकाराने नागपूरकरांना एक नवी आशा मिळाली आहे. वाहतुकीचा गोंधळ कमी करून शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा आहे. बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला होणारी अनधिकृत पार्किंग आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर आता नियंत्रण येण्याची शक्यता आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही नवी व्यवस्था लागू राहील. नागपूरच्या रस्त्यांवर शिस्तबद्ध वाहतुकीचा नवा प्रवास सुरू होईल, अशी आशा आहे. नागपूरकर आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, मतानी यांचा हा नवा प्रयोग त्यांच्या शहराला खऱ्या अर्थाने गतिमान आणि सुरक्षित बनवेल का.
Gadchiroli : पावसाच्या निसर्ग क्रांतीत हेलिकॉप्टरने दिले आशेचे पंख