महाराष्ट्र

Nagpur Riots : धार्मिक वादाने सामाजिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह

VHP : औरंगजेबाच्या कबरीवरून संघर्ष शिगेला

Post View : 13

Author

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव शिगेला आहे. विश्व हिंदू परिषदेने ती हटवण्याची मागणी आक्रमकपणे पुढे रेटली आहे. वाढत्या अस्थिरतेमुळे पोलिस हायअलर्टवर असून कायदा-सुव्यवस्थेला मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून तणाव अधिकच वाढला असून विश्व हिंदू परिषदेने (VHP) आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात आधीच अस्थिरता असताना आता विश्व हिंदू परिषदेने ठाम भूमिका घेत औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत ही कबर हटविली जात नाही, तोपर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या पार्श्वभूमीवर नागपुरातील वातावरण चिघळण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

शहरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल हायअलर्टवर आहे. काही समाजविघातक प्रवृत्तींकडून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागपुरात नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Abu Azmi : शांततेच्या नगरीला दंगलीचा ग्रहण

कठोर भूमिका

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत जिहादी प्रवृत्तींच्या लोकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. VHPचे प्रांत सहमंत्री देवेश मिश्रा यांनी आरोप केला आहे की, नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता आणि यामध्ये जिहादी मानसिकतेच्या लोकांचा हात आहे.

औरंगजेब हा क्रूर आक्रमक होता आणि त्याच्या कबरीला पवित्र स्थळ म्हणून मान्यता देणे हा ऐतिहासिक अन्याय आहे. हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही बाबतीत आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

दंगलीच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांना शहरातील शांतता राखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात काही समाजविघातक घटक अफवा पसरवत असून त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. हिंसाचाराच्या घटनांमध्ये पोलीस दलावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव आला असून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागणार आहेत. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संभाव्य अराजकता रोखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 कारवाईची मागणी

विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (NSA) अंतर्गत अटक करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने जर योग्य वेळी पाऊले उचलली नाहीत, तर हा तणाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील या परिस्थितीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पुढील काही दिवस हे निर्णायक ठरणार आहेत. प्रशासनाने तणाव निवळविण्यासाठी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!