महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव आल्यानंतर नागपूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस कोणावर सोपवेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वत्र विजयाचा झेंडा रोवला. सर्वत्र काँग्रेसच्या खासदारांनी बाजी मारली, पण सत्तेचा तख्त मात्र भाजपच्या हाती लागला. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही विजयाची खात्री होती. पण अतिआत्मविश्वास कधी कधी पाय घसरवतो आणि तसंच काहीसं काँग्रेसच्या बाबतीत घडलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आणि काँग्रेसच्या अपयशाचा ठपका माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ठेवण्यात आला. लोकसभेच्या यशाचं श्रेय त्यांच्या खात्यात जमा झाले असले तरी, विधानसभेच्या पराभवाने त्यांचे प्रदेशाध्यक्षपद हिरावले गेले. पक्षांतर्गत विरोध आणि कार्यकर्त्यांचा रोष यामुळे नानांचा तख्त गडगडला. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात जोरात सुरू आहे.
प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखण्यात मग्न आहे. काँग्रेसही मागे नाही. विधानसभेतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस आता नव्या जोमाने रणनीती आखत आहे. नाना पटोले यांच्यावरील विश्वास उडाल्याने, नागपूर महापालिका निवडणुकीची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात सर्वात आघाडीवर आहे, नागपूरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं नाव. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 मध्ये त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांना 6 हजार 173 मतांनी धूळ चारली. आता हीच आक्रमकता आणि रणनीती त्यांना नागपूर महापालिकेच्या रणांगणात उतरवायची आहे.नागपूर, हा भाजपचा अभेद्य गड. इथे सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असते. आणि विरोधकांना निधी मिळवणे म्हणजे जणू दगडाला डोकं आपटण्यासारखं. पण विकास ठाकरे यांनी ही समीकरणे बदलली आहेत.
सरकार दरबारी ठाकरेंचे वजन
विरोधी पक्षाचे आमदार असूनही, त्यांच्या तक्रारींना सरकारकडून तातडीने प्रतिसाद मिळतो. म्हाडाच्या घरकूल योजनेला स्थगिती मिळवणं असो, की इतर विकासकामांसाठी निधी खेचून आणणे, ठाकरे यांनी हे सिद्ध केले की, ते केवळ आक्रमकच नाहीत, तर सरकार दरबारीही त्यांचे वजन आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा जोरात आहे. नागपूरात भाजपच्या सत्ताकाळात विरोधकांचा आवाज दबवला जातो. तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो, असा आरोप नेहमीच होतो. काँग्रेस नेते सुनील केदार, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्यांचे खच्चीकरण झाल्याचंही बोलल्या जाते. पण विकास ठाकरे यांच्याबाबतीत चित्र वेगळे आहे. त्यांनी मागणी केलेला निधी मिळतो, तक्रारींवर कारवाई होते. यामुळेच नागपूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. विकास ठाकरे यांचा राजकीय प्रवास म्हणजे नगरसेवक ते आमदार असा थक्क करणारा आहे.
पश्चिम नागपूर हा कधीकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ होता. पण ठाकरे यांनी तिथून सलग दोनदा विजय मिळवला. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरत, भाजपशी दोन हात करत त्यांनी आपले स्थान निर्माण केले. त्यांच्यावर भाजपशी सलगी असल्याचा आरोपही होतो, पण ते तो फेटाळून लावतात. सरकार विरोधात आंदोलने करताना त्यांची आक्रमकता आणि सरकार दरबारी त्यांचे वजन, यामुळे ते काँग्रेससाठी हुकमी एक्का ठरत आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी विकास ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांचा आक्रमकपणा, रणनीती आणि सरकार दरबारी असलेले वजन यामुळे काँग्रेसला विजयाची आशा आहे. आता प्रश्न आहे, ठाकरे खरंच भाजपच्या गडाला भेदू शकतील का? येत्या काळातच याचे उत्तर मिळेल.
