महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : ओबीसींच्या हक्कांसाठी पूर्व विदर्भातून भडकली मशाल

Congress : मुख्यमंत्री आशेचे किरण, मग जीआर रद्द का नाही?

Author

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद तापत असताना, काँग्रेसने नागपुरात ओबीसी हक्कांसाठी महामोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या आरक्षणाच्या मुद्द्याने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करून गावोगाव चर्चेची ठिणगी पाडली. मात्र, काही मागण्या मेनी केल्यानंतरही हा वाद थांबण्याऐवजी अधिकच तापला आहे. विरोधक सातत्याने ओबीसी समाजावर गंडांतर येत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचा जाहीर मुद्दा उपस्थित केला आहे. वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये ओबीसी महामोर्चा काढण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात 21 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी संघटना आणि काँग्रेस पक्षाची विशेष बैठक घेत रणनीती आखली.

भंडारा येथील संत तुकाराम महाराज सभागृहात 10 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या ओबीसी महामोर्चाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले. आपली लढाई ही नेता होण्यासाठी नाही, तर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आहे, असे ते म्हणाले.वडेट्टीवार यांनी सांगितले की, जो कोणी पक्ष बाजूला ठेवून या लढाईत सामील होईल, त्याचे मनापासून स्वागत आहे. 2 सप्टेंबरचा तो काळा जीआर रद्द करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना सोबत घेण्याची तयारी आहे. मात्र, काही नेते या जीआरला समर्थन देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार आणि काही नेते केवळ ओबीसींच्या मतांसाठी त्यांचा वापर करतात, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. त्यांना गरज असते तेव्हा आम्ही सोबत असतो. पण आता सरकारने आम्हाला संकटात टाकले आहे. ज्यांना आम्ही मदत केली, त्यांची नैतिक जबाबदारी आहे समाजासोबत उभे राहण्याची, असे ते म्हणाले.

Local Body Election : जनतेच्या मनातील विजेता ठरेल भाजपचा उमेदवार

जातीनिहाय जनगणनेची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी,’ हा आमचा हक्क असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी या प्रश्नावर आवाज उठवला, म्हणूनच पंतप्रधान मोदींनाही तशी भूमिका घ्यावी लागली, असे सांगून त्यांनी राजकीय नेत्यांना आव्हान दिले. आता बेसावध राहून चालणार नाही. कोण आपल्या हितासाठी लढत आहे, हे तपासले पाहिजे, असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिला.एकीकडे सरसकट आरक्षण मिळाल्याचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री सांगतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण सत्य हे आहे की, पुढील सहा-सात महिन्यांत सर्व ओबीसीमध्ये येतील आणि मग ‘बळी तो कान पिळी’ अशी स्थिती निर्माण होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

खासगीकरणाचा सपाटा सुरू असल्याने उद्या क्लास-3 ची नोकरी मिळवणेही मुश्किल होईल, कॉन्स्टेबल पदावरही संधी मिळणार नाही, असे ते म्हणाले.भुजबळ यांनी फडणवीसांना ‘आशेचा किरण’ म्हटले आहे. तर मग सरकारमध्ये बसून जीआर रद्द का करत नाहीत, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आज काही नेत्यांकडे मोठे कारखाने, संस्था आणि फौजफाटा आहे. पण ओबीसी समाज संसाधनांमध्ये कमकुवत आणि विस्थापित आहे. तरीही प्रत्येक गावात पोहोचून लहान समाजांना सोबत घ्यायला हवे, हा जीआर उध्वस्त करणारा असल्याचे सांगायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असून, विदर्भातून ही चळवळ उभी राहिली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. एकत्रितपणे संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. आपला कोणाला विरोध नाही, सरकारला विरोध आहे. कारण त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली, असे स्पष्ट करत त्यांनी निर्णयांचा ठाम विरोध जाहीर केला.

IPS Archit Chandak : ही रात्र गुन्हेगारांसाठी देखील अमावस्येचीच 

आज जर रस्त्यावर आलो नाही, तर उद्या हक्क आणि अधिकार हिरावले जातील, असा इशारा देऊन त्यांनी समाजाला जागृत केले.वडेट्टीवार यांनी जोर देऊन सांगितले की, माझा संघर्ष नेता होण्यासाठी नाही. मी लढतोय ते ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी. ही लढाई निकराने लढली पाहिजे. या बैठकीत ओबीसी संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामोर्चासाठी रणनीती आखण्यात आली असून, हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नवे वळण आणू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!